Mon, Apr 22, 2019 11:49होमपेज › Solapur › पालखी सोहळ्याचे उद्या जिल्ह्यात आगमन

पालखी सोहळ्याचे उद्या जिल्ह्यात आगमन

Published On: Jul 16 2018 1:20AM | Last Updated: Jul 15 2018 10:29PMअकलूज : रवि शिरढोणे

श्री संत ज्ञानेश्‍वर महाराजांचा पालखी सोहळा उद्या मंगळवार, 17 जुलै रोजी, तर श्री संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा बुधवार,   18 जुलै रोजी सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करीत आहे. त्यांच्या सेवा व सुरक्षेसाठी पोलिस प्रशासन सज्ज झाल्याची  माहिती अकलूजचे उपविभागीय पोलिस अधिकारी मंगेश चव्हाण यांनी दिली.

मंगळवार, 17 रोजी श्री संत ज्ञानेश्‍वर महाराजांच्या पालखीचे  धर्मपुरी (ता. माळशिरस) येथे  सोलापूर जिल्ह्यात आगमन होत आहे. तर बुधवार, 18 जुलै रोजी श्री तुकाराम महाराजांच्या पालखीचे सराटी- अकलूज पुलावर(ता. माळशिरस) येथे जिल्ह्यात आगमन होत आहे. श्री संत ज्ञानेश्‍वर महाराजांच्या पालखीकरीता एक पोलिस अधीक्षक, 4 उपविभागीय पोलिस अधिकारी, 9 पोलिस निरीक्षक,  33 सहा. पोलिस निरीक्षक, 400 पुरुष कर्मचारी, 100 महिला कर्मचारी, 100 पुरुष व 50 महिला होमगार्ड असणार आहेत. पालखी मुक्काम, रिंगण सोहळे, विसावा याठिकाणी विशेष पोलिस यंत्रणा काम करणार आहे. 17 जुलै रोजी ज्ञानेश्‍वर महाराजांच्या पालखीचे सोलापूर जिल्ह्यात धर्मपुरी येथे आगमन होत आहे. शिंगणापूर फाटा मार्गे नातेपुते येथे मुक्काम असून 18 जुलै रोजी नातेपुतेहून पुरंदावडे येथे गोलरिंगण व माळशिरस येथे मुक्काम, 19 जुलै रोजी खुडूसफाटा येथे गोलरिंगण, विझोरी मार्गे वेळापूरला मुक्काम, 20 जुलै रोजी ठाकुरबुवा समाधी येथे गोलरिंगण, तोंडले-बोंडले, टप्पा येथून भंडीशेगावकडे मार्गस्थ होत आहे. या सर्व स्थळावर पोलिस माहिती केंद्र उभारण्यात येणार असून पोलिसांना कडक सुरक्षेच्या सूचना दिल्या आहेत.

श्री  संत ज्ञानेश्‍वरांच्या पालखी सोबत एक पोलिस अधीक्षक, 2 उपविभागीय पोलिस अधिकारी, 4 पोलिस निरीक्षक, 11 सहायक पोलिस उपनिरीक्षक, 120 कर्मचारी, 11 ट्रॅफिक सेवक, 16 महिला कर्मचारी, एस. आर. पी. ची एक तुकडी, बी. डी. टी.एस. पथक, 4 कॅमेरामन असणार आहेत. संत श्री तुकाराम महाराजांची पालखीचे बुधवार, 18 जुलै रोजी सराटी येथे आगमन होऊन स. मा. वि. मैदानावर गोलरिंगण व अकलूजला मुक्काम. 19 जुलै रोजी माळीनगर येथे उभेरिंगण, पायरीपूल, श्रीपूर मार्गे बोरगाव येथे मुक्काम, 20 जुलै रोजी बोरगाव, माळखांबी, तोंडले बोंडले (धावा), टप्पा, पिराची कुरोलीकडे मार्गस्थ होणार आहे. अकलूज पोलिस ठाण्यांतर्गत श्रीपूर हे औटपोस्ट, तर माळीनगर, यशवंतनगर, कोंडबावी हे पोलिस बीट आहेत. माळशिरस पोलिस ठाणे अंतर्गत पिलीव हे औटपोस्ट, तर सदाशिवनगर, खुडूस, मेडद, गारवाड हे बीट आहेत. वेळापूर पोलिस ठाणे अंतर्गत खंडाळी, वेळापूर, तोंडले बोंडले, साळमुख हे बिट आहेत. नातेपुते पोलिस ठाणे अंतर्गत शिवपुरी औटपोस्ट, तर धर्मपुरी, मांडवे, फोंडशिरस हे बिट आहेत व ही सर्व पोलिस यंत्रणा पालखी मार्गावर येते. यामुळे पोलिस यंत्रणेला  वैष्णवांची सुरक्षा सोईची होणार आहे. ठिकठिकाणी पोलिस सेवा व माहिती, मदत कक्ष उभारण्यात येत असल्याचे अकलूज पोलिस ठाण्याचे अधिकारी अरुण सावंत यांनी सांगितले.