Sun, May 26, 2019 01:30होमपेज › Solapur › पालखी सोहळा आज पंढरपूर तालुक्यात; टप्पा येथे रंगणार बंधूभेटीचा सोहळा

पालखी सोहळा आज पंढरपूर तालुक्यात; टप्पा येथे रंगणार बंधूभेटीचा सोहळा

Published On: Jul 20 2018 1:13AM | Last Updated: Jul 19 2018 8:30PMभाळवणी : नितीन शिंदे

सावळ्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरच्या दिशेने  निघालेला  ज्ञानोबा-तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा उद्या पंढरपूर तालुक्यात प्रवेश करणार असून संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महराजांचा पालखी सोहळा भंडीशेगाव व जगद‍्गुरू तुकाराम महाराज पालखी सोहळा पिराचीकुरोली येथे मुक्‍कामी विसावणार आहे. पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी संपूर्ण परिसर भक्तीमय झाला आहे. संपूर्ण परिसर टाळ-मृदुंगाच्या गजराने दुमदुमून गेलेला असतो. पालखी तळावर व तालुक्यातील पालखीमार्गावरील गावोगावी पालखी सोहळ्यातील वारकर्‍यांची सोय करण्यात येत असते. संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराज पालखी सोहळ्याचे तोंडले-बोंडले येथे दुपारच्या विसाव्यानंतर ठाकूरबुवा समाधी येथे गोल रिंगण असणार आहे.

त्यानंतर संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराज, जगद‍्गुरू संत तुकाराम महाराज, संत सोपानकाका महाराजांची पालखी शुक्रवार (20) रोजी माळशिरस तालुक्यातून विठूरायाच्या पंढरपूर तालुक्यामध्ये प्रवेश करतात. याप्रसंगी तालुका सरहद्दीवर टप्पा (ता.पंढरपूर) येथे पंढरपूर पंचायत समिती व प्रशासनाच्यावतीने जंगी स्वागत केले जाते.  संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराज व संत सोपानकाका महाराज यांच्या बंधूभेटीचा सोहळा टप्पा येथे पार पडतो. या स्वागतानंतर संत ज्ञानेश्‍वर महाराज व सोपानकाका महाराज पालखी सोहळा भंडीशेगाव व जगद‍्गुरू तुकाराम महाराज पालखी सोहळा पिराचीकुरोली येथे मुक्कामी मार्गस्थ होणार आहे. 

याठिकाणी पालखी तळावर वारकर्‍यांना शुुध्द पाणी, पालखी तळ व गावठाण जागेची साफसफाई, आरोग्यसेवा उपलब्ध करून देणे, फिरते शौचालये आदी बाबींचे तालुका प्रशासन व ग्रामपंचायतीकडून नियोजन करण्यात आले आहे. पालखी मार्गावर सर्वत्र स्वच्छता करण्यात आली असून रस्त्याच्या दुतर्फा वैष्णवांच्या स्वागताच्या कमानी उभारल्या आहेत. त्यामुळे पालखी सोहळा जसजसा जवळ येऊ लागला तसतसा पंढरपूर तालुकानगरीत विठूरायाचा गजर व भक्तीमय वातावरण होण्यास सुरूवात झाली आहे.

आज ठाकूरबुवा येथे माऊलींचे गोल रिंगण

संत ज्ञानेश्‍वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे गोल रिंगण आज (20 रोजी) ठाकूरबुवा येथील मैदानात होत असून रिंगण सोहळ्याची तयारी पूर्ण झाली आहे. वेळापूर  येथील मुक्कामानंतर श्रीसंत ज्ञानेश्‍वर माऊलींचा पालखी  सोहळा शुक्रवार (20 रोजी) भंडीशेगावी मुक्कामी जात असतो. यावेळी तिसरे गोल रिंगण ठाकूरबुवा येथील कोळेकर व व्यवहारे यांच्या शेतात पूर्वापारपासून होत आहे. या सोहळ्यासाठी उघडेवाडी ग्रामपंचायतीच्यावतीने सर्व तयारी पूर्ण झाल्याची माहिती सरपंच चाँद मुलाणी  यांनी दिली. यावेळी उपसरपंच नितीन चौगुले, ग्रामसेवक पांडुरंग ठवरे, तलाठी ठोंबरे, कोतवाल मल्हारी देवकते, लिपीक  भारत कोळपे उपस्थित होते. या तयारीमध्ये जमीन खणून, गवतकाडी, छोटेमोठे दगड वेचून, पाळी मारुन हे रिंगण तयार करण्यात आले आहे. परिसरातील विहिरी व बोअर  टीसीएल पावडर टाकून निर्जंतुकीकरण करण्यात आल्या आहेत व दिवाबत्तीची सोय सर्वत्र करण्यात आली आहे. गावतील गटारीवरती बीएचसी मेलॅथीऑन पावडर टाकण्यात आली असून रिंगण सोहळ्यासाठी तयारी पूर्ण झाली आहे.