होमपेज › Solapur › संत सोपानकाकांच्या पालखीचे बोंडले येथे उत्साहात स्वागत 

संत सोपानकाकांच्या पालखीचे बोंडले येथे स्वागत 

Published On: Jul 19 2018 9:43PM | Last Updated: Jul 19 2018 10:20PMबोंडले: विजयकुमार देशमुख

पालखी सोहळा अंतिम टप्प्यात आलेला आहे पंढरीच्या पांडुरंगाच्या भेटीसाठी निघालेल्या श्री.संत सोपानकाकांच्या पालखी सोहळ्याचे गुरुवारी बोंडले (ता.माळशिरस) येथे तोफाची सलामी देऊन मोठया उत्साहात स्वागत करण्यात आले.

दरम्यान श्री.संत सोपानकाकांचा पालखी सोहळा अकलुज येथील मुक्काम आटोपून बोंडले च्या दिशेने पुढील मुक्कामासाठी मार्गस्थ झाला वाटेमध्ये श्रीपूर, बोरगाव,  माळखांबी या ठिकाणी भाविकांनी पालखीचे दर्शन घेतले.

बोंडले येथील चौकामध्ये पालखी सोहळा आल्यानंतर बोंडले ग्रामपंचायतीच्या व ग्रामस्थांच्या वतीने पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यात आले. यावेळी श्री.संत सोपानकाकांच्या पालखी सोहळ्यासोबत असणारे लाखो वारकरी व विठू माऊलीच्या जयघोषा मुळे परिरातील वातावरण भक्तीमय झाले होते.

पालखी सोहळा बोंडले येथील चौकामध्ये आल्यानंतर गावच्या सरपंच राखी गायकवाड यांनी पालखीचे स्वागत केले यावेळी उपसरपंच विजयसिंह माने-देशमुख, पत्रकार विजयकुमार देशमुख, भागवत पाटील, सोसायटीचे व्हा.चेरमन दत्तात्रय जाधव, पंडितराव माने - देशमुख, पोलीस पाटिल पोपट वाघमारे - पाटिल, नामदेव जाधव, ग्रामपंचयात सदस्य आनंद जाधव, हरिभाऊ जाधव, धनंजय जाधव, तानाजी जाधव, धिरज जगताप, सुर्याजी माने देशमुख, अभिनंदन जाधव, सत्यजित जगताप, ग्रामसेवक बी.बी. कोरबु, विजय लोंढे, योगेश तुपे आदींनी पालखीचे स्वागत केले. पालखीच्या स्वागतासाठी ग्रामस्थाच्या वतीने तोफांची सलामी देण्यात आली. यावेळी बोंडले गावातील व पंचक्रोशीतील भाविकांनी पालखी सोहळ्याचे मोठया उत्साहात स्वागत केले.

यानंतर पालखी सोहळा विठ्ठल रुक्मिणी मंदिरात विसावला यावेळी सोपानकाकांच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. सोपानकाकांच्या पालखी सोहळ्यासोबत रथापुढे २५ व मागे ६० दिंडया आहेत. सोहळ्यासोबत जवळपास १ लाख ५० हजार जनसमुदाय आहे.

उद्या दु. १ वाजेपर्यंत सोपानकाकांचा पालखी सोहळा बोंडले येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरा मध्येच विसावणार आहे. यानंतर सोपानकाकांची पालखी बोंडले येथील मुक्काम आटोपून पुढील मुक्कामासाठी मार्गस्थ होणार आहे. दरम्यान श्री.संत सोपानकाकांच्या व श्री.संत तुकाराम महाराज यांच्या  पालखीची भेट बोंडले चौकात होणार आहे. व नंतर श्री.संत सोपानकाकांची पालखी बंधु भेटी साठी टप्पा (ता.पंढरपूर) येथे प्रस्थान करणार आहे.