Thu, Nov 22, 2018 01:38



होमपेज › Solapur › प्रहार संघटनेचे खुपसे पोलिसांच्या ताब्यात

प्रहार संघटनेचे खुपसे पोलिसांच्या ताब्यात

Published On: Mar 14 2018 12:48AM | Last Updated: Mar 13 2018 10:51PM



करमाळा :  प्रतिनिधी

शेतीपंपांचा विद्युतपुरवठा खंडित होत असल्याने पिके जळून जात आहेत. याप्रकरणी वीज वितरण कार्यालयच जाळून टाकण्याचा इशारा प्रहार संघटनेतर्फे सोशल मीडियाद्वारे देण्यात आल्याने आंदोलन करण्यासाठी निघालेल्या अतुल खुपसे-पाटील यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

करमाळा शहर व तालुक्याच्या ग्रामीण भागामध्ये वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे वीज ग्राहक त्रस्त झाला आहेत. पिके शेतावर जळून जात आहेत. याविरूध्द प्रहार संघटनेचे नेते अतुल खुपसे-पाटील यांनी पिके जाळण्यास कारणीभूत ठरत असलेले वीज वितरण कार्यालय जाळणार, असा इशारा लेखी निवेदनाव्दारे दिलेला होता. 

त्यानुसार बुधवारी ते आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह करमाळा तालुक्याच्या ग्रामीण भागामध्ये छुप्या पध्दतीने फिरत होते. सकाळपासून पोलिस त्यांच्या मागावर होते.  सायं. 6 वाजता करमाळा येथील वीज वितरण कार्यालयासमोरून त्यांच्यासह कार्यकर्त्यांना अटक करून करमाळा पोलिस ठाण्यामध्ये आणण्यात आले. कारवाईची पुढील प्रक्रिया सध्या करमाळा पोलिस स्टेशन येथे उशिरापर्यंत सुरु होती.

सोशल मीडियावर चर्चा
सकाळपासून प्रहार कार्यकर्त्यांनी करमाळा तालुक्यात फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅपवर महावितरण कार्यालयाच्या जाळपोळ आंदोलनाच्या वेगवेगळ्या भागात पोस्ट फिरवल्यामुळे प्रहार कार्यकर्त्यांना पकडण्यासाठी पोलिसांची धावपळ सुरू झाली. सोलापूरवरून राखीव दलाची जास्तीची फौज मागवण्यात आली. तालुक्यातील सर्व महावितरण कार्यालयाला पोलिसांनी बंदोबस्त  दिला. 
यावेळी जिल्हाध्यक्ष रमेश पाटील, जिल्हा संघटक विठ्ठल मस्के, शरद पाटील, विकी मोरे, अतुल राऊत, भाऊसाहेब खाटमोडे, अतुल ताकमोगे उपस्थित होते.