Wed, Jul 17, 2019 18:09होमपेज › Solapur › पद्मशाली ज्ञाती संस्थेच्या अध्यक्षपदाचा वाद विकोपाला 

पद्मशाली ज्ञाती संस्थेच्या अध्यक्षपदाचा वाद विकोपाला 

Published On: Jun 25 2018 1:53AM | Last Updated: Jun 24 2018 9:48PMसोलापूर : प्रतिनिधी

सार्‍या पूर्व  भागाचे लक्ष लागून राहिलेल्या पद्मशाली ज्ञाती संस्थेच्या अध्यक्षपदाची निवड रविवारी वादग्रस्त ठरली. महेश कोठे व सुरेश फलमारी हे दोघेही आपापल्या भूमिकेवर ठाम असल्याने सभेत पेच निर्माण झाला. या दोघांनीही अध्यक्षपदी आपली निवड झाल्याचा दावा केला आहे. यामुळे या निवडीला वेगळेच गंभीर वळण लागले आहे.

संस्थेची 66 वी वार्षिक सर्वसाधारण सभा अध्यक्ष महेश कोठे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. नवीन पाच विश्‍वस्त तसेच  अध्यक्षांची निवड करण्याचे विषय सभेच्या अजेंड्यावर होते. यापैकी अध्यक्षपदासाठी इच्छुकांची संख्या जास्त असल्याने  या निवडीकडे सार्‍या समाजाचे लक्ष लागले होते. विद्यमान अध्यक्ष कोठे यांच्या समर्थकांनी पुन्हा कोठे हेच अध्यक्ष व्हावेत,
असा जोर धरला होता. दुसरीकडे तीन वर्षांपूर्वी श्रेष्ठींनी आपल्याला आगामी अध्यक्षपदासाठी संधी देण्याचा शब्द दिला होता, असे सांगत विद्यमान सुरेश फलमारी यांनी अध्यक्षपदावर दावा केला होता. कोठे व फलमारी हे दोघेही अध्यक्षपदाविषयी ठाम असल्याने रविवारच्या बैठकीत काय होणार, याविषयी समाजबांधवांना उत्सुकता होती.

सभेत ताळेबंद व अन्य विषयांना मंजुरी दिल्यावर नवीन विश्‍वस्त निवडीचा प्रस्ताव मांडण्यात आला. सत्यनारायण बोल्ली, नागनाथ मुदगुंडी, पुरुषोत्तम उडता, मल्लिकार्जुन कमटम, श्रीनिवास क्यातम यांच्या निवड समितीने बंद खोलीत चर्चा करुन मुरलीधर आरकाल, रामकृष्ण कोंड्याल, जनार्दन कारमपुरी, रामचंद्र जन्नू, नरसप्पा इप्पाकायल यांची निवड घोषित केली. यानंतर अध्यक्षपदाच्या निवडीची प्रक्रिया सुरु झाली. निवडीचे अधिकार निवड समिती व नवीन विश्‍वस्तांना देण्यात आले.

या पदासाठी कोठे, फलमारी, बालराज बोल्ली, भूपती कमटम, मनोहर इगे  आदींनी इच्छा व्यक्त केली. निवड समिती व नवीन विश्‍वस्तांनी बंद खोलीत इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या.  पाचपैकी कोठे व फलमारी या दोघांत अध्यक्षपदासाठी रस्सीखेच झाली. आपण विधानसभेला इच्छुक असल्याने ही निवडणूक होईपर्यंत म्हणजे आगामी दीड वर्षांसाठी आपल्याला पुन्हा अध्यक्षपदाची संधी द्यावी, उर्वरित दीड वर्षाच्या कालावधीसाठी फलमारी यांना अध्यक्ष करावे, असा प्रस्ताव ठेवला. मात्र ते फलमारी व त्यांच्या समर्थकांना अमान्य होते. निवड कमिटीतील बोल्ली यांनी तीन वर्षांपूर्वी दिलेल्या शब्दानुसार फलमारी यांना संधी द्यावी, अशी भूमिका मांडली. मात्र कोठे यांनी अध्यक्षपदासाठी हट्ट कायम ठेवला. यावरुन बराच वेळ खल व वाद झाला. मात्र निवड समिती व नवीन विश्‍वस्तांमध्ये याबाबत एकमत झाले नाही. बोल्ली वगळता निवड समिती व नवीन विश्‍वस्तांनी गोंधळातच कोठे यांनी निवड जाहीर केली. हा निर्णय अमान्य करीत फलमारी समर्थकांनी फलमारी यांची अध्यक्षपदी निवड केल्याची घोषणा केली. 

आधी कोठे व काही वेळेच्या अंतराने फलमारी यांचा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्याचा अजब प्रकार मार्कंडेय मंदिरात घडला.  सभेत दोन अध्यक्षांची निवड झाल्याने अध्यक्षपदाची निवड वादग्रस्त ठरली आहे. सभेला अशोक इंदापुरे, नागेश सरगम, पांडुरंग दिड्डी, महांकाळ येलदी, श्रीनिवास रिकमल्ले, नागेश सरगम, श्रीधर चिट्याल, विजय चिप्पा, व्यंकटेश कोंडी, निरंजन बोद्धूल, शशिकांत केंची आदी उपस्थित होते.