होमपेज › Solapur › उस्मानाबाद मेडिकल कॉलेजचा श्रेयवादही जोरात!

उस्मानाबाद मेडिकल कॉलेजचा श्रेयवादही जोरात!

Published On: Jul 20 2018 1:13AM | Last Updated: Jul 19 2018 10:59PMउस्मानाबाद : भीमाशंकर वाघमारे

अनेक वर्षांपासून चर्चेत असलेल्या शासकीय मेडिकल कॉलेजची अखेर विधिमंडळात घोषणा झाली खरी; मात्र आता हे श्रेय कोणाचे यावरून सत्ताधारी, विरोधक कार्यकर्त्यांची एकमेकांत जुंपली आहे. सोशल मीडियावर यावरून घमासान सुरू आहे. यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते, पदाधिकारी आघाडीवर आहेत.

उस्मानाबादेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्हावे, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी मागील सहा ते सात वर्षांपासून सातत्याने शासन दरबारी निवेदने दिली आहेत. संधी मिळेल तेव्हा प्रत्येक आरोग्यमंत्र्यांना विनंतीही केली आहे. चार वर्षांपूर्वी जिल्हा रुग्णालयाची नवीन इमारत मंजूर झाली, तेव्हा काँग्रेसचे आमदार व तत्कालिन पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांनीही शासकीय महाविद्यालयाला पूरक असेच नियोजन केले. त्यानंतर ही इमारतही शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला साजेशीच झाली. दरम्यानच्या काळात सत्तांतर झाले. प्रत्येक जिल्ह्यात भाजपची वाटचाल आक्रमक राहिली. उस्मानाबादही त्याला अपवाद राहिले नाही. येथे आ. सुजितसिंह ठाकूर यांच्या माध्यमातून प्रलंबित प्रश्‍नांचा पाठपुरावा सातत्याने सुरुच राहिला. त्यालाच एक पूरक बाब म्हणजे मार्च महिन्यात उस्मानाबादेत आरोग्य महामेळावा झाला.

त्यात वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी वैद्यकीय महाविद्यालयाबाबत सकारात्मक संकेत दिले. त्या कार्यक्रमातही आ. ठाकूर, आ. पाटील यांच्यासह इतरही अनेक नेत्यांनी शहरात वैद्यकीय महाविद्यालय व्हावे, अशी मागणी केली होती. त्यानंतर मंगळवारी ना. महाजन यांनी विधिमंडळात थेट घोषणाच केली. याबरोबर जिल्ह्यात श्रेयवादही तितक्यात दणक्यात सुरु झाली. यात आ. पाटील यांच्यासह आ. ठाकूर यांचे निकटचे पदाधिकारीही पुढे आहेत. बुधवारीही दिवसभर यावरुन व्हॉट्सअ‍ॅपवरील स्थानिक ग्रुपचे इनबॉक्स फुल्ल झाले. आपल्याच नेत्याने कसा पाठपुरावा केला आहे, याचे पुरावे सोशल मीडियावर देण्याची धडपड आणि कसरतही दोन्ही बाजूचे समर्थक कार्यकर्ते करू लागले आहेत.