Sun, May 26, 2019 12:52होमपेज › Solapur › सेंद्रिय शेतीची गरज

सेंद्रिय शेतीची गरज

Published On: Mar 11 2018 11:24PM | Last Updated: Mar 11 2018 11:19PMसोलापूर : प्रतिनिधी

केमिकलमुळे मानवी आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे भविष्यात केमिकलमुक्‍त सेंद्रिय शेतीची गरज निर्माण झाली असून त्यासाठी राज्य शासन शेतकर्‍यांना सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहे. राज्य शासन सर्वच आघाड्यांवर यशस्वी ठरले असून, यंदा खताचे दर आणि विक्री स्थिर ठेवण्यात सरकार यशस्वी ठरले आहे. यंदा शेतकर्‍यांना खतासाठी मारामारी करण्याची वेळ आली नसल्याचे प्रतिपादन राज्याचे सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी केले आहे.

महाराष्ट्र शासन व कृषी विभागाच्या वतीने सोलापुरातील होम मैदान येथे आयोजित करण्यात आलेल्या कृषी महोत्सवाचे उद्घाटन सहकार मंत्री देशमुख बोलत होते. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख, जि.प. अध्यक्ष संजयमामा शिंदे, महापौर शोभा बनशेट्टी, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भारुड, आत्माचे प्रकल्प संचालक विजयकुमार बरबडे, सभापती मल्लिकार्जुन पाटील, पक्षनेते आनंद तानवडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यावेळी उपस्थित होते. 

सहकार मंत्री देशमुख यांनी जलयुक्‍त शिवार अभियानाला गती देण्याची गरज असताना काही मंडळी खो घालण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप केला. शेतकर्‍यांनी पिकविलेल्या कृषी मालाला योग्य भाव मिळावा, यासाठी 132 आठवडे बाजार राज्यात सुरू करण्यात आले आहेत. तसेच भविष्यातही विक्री व्यवस्थापन सक्षम करण्याचा प्रयत्न राज्यशासन करणार असल्याचे सहकार मंत्री यावेळी म्हणाले. तसेच राज्यातील विकास कार्यकारी सोसायट्याही सक्षम करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. मुद्रा योजनेच्या माध्यमातून अनेक युवकांना रोजगार देण्याचा प्रयत्न करण्यात असल्याचे सहकार मंत्री यावेळी म्हणाले.

या महोत्सवासाठी प्रमुख मार्गदर्शन म्हणून मार्गदर्शन करताना अभिनव गु्रपचे ज्ञानेश्‍वर बोडके यांनी सेंद्रीय शेतीची गरज असली तरी त्यासाठी गट शेतीच्या माध्यमातून शेतकर्‍यांना बाजार पेठ मिळवून देण्याची गरज असल्याचे सांगितले. तसेच गट शेतीच्या माध्यमातून शेतकर्‍यांनी पुढे यावे, त्यासाठी अभिनव गु्रप आणि पणन विभागाच्या माध्यमातून चांगली बाजार पेठ उपलब्ध करुन देऊ, असे सांगितले.

यावेळी जिल्ह्यातील कृषी क्षेत्रात उत्कृष्ट काम करणार्‍या शेतकरी, शेतकरी गटाचे तसेच महिला बचत गटांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाधिकारी राजेंद्र भारुड यांनी केले, तर आभार जिल्हा कृषी अधीक्षक बिराजदार यांनी केले.