Sat, Mar 23, 2019 16:48होमपेज › Solapur › भाळवणीत 50 एकर क्षेत्रावर सेंद्रिय शेती

भाळवणीत 50 एकर क्षेत्रावर सेंद्रिय शेती

Published On: Mar 05 2018 1:45AM | Last Updated: Mar 04 2018 10:03PMभाळवणी : वार्ताहर

रासायनिक   खते, किटकनाशकांचा वाढता खर्च लक्षात घेवून येथील तरूण शेतकर्‍यांनी एकत्रीत येवून सेंद्रिय शेतीचा निर्णय घेतला. त्यामुळे आज भाळवणी (ता.पंढरपूर) गावात सेंद्रिय खताचा वापर करून सुमारे 50 एकर क्षेत्रामध्ये सेंद्रिय शेती फुलवली आहे.

रासायिन खते व किटकनाशकांचा वापर करून शेतातील पालेभाजे, फळे, धान्य खाल्याने त्याचा माणसांच्या आरोग्यावर  विपरित परिणाम जाणवू लागले आहेत. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून सेंद्रिय शेतीकडे शेतकर्‍यांचा कल वाढू लागला आहे.

येथील शेतकर्‍यांनीही देशी गायीवर आधारित विषमुक्त नैसिर्गिक शेती करण्याचा ध्यास घेतला असून गावातील माजी सरपंच जयंत शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली 25 तरूणांनी एकत्रीत येऊन येथे कृषीआधार सेंद्रिय शेतीमाल उत्पादक गटाची स्थापना करण्यात आली होती. या गटाला राज्य शासनाकडून विविध योजनेअंतर्गत शेत मेहनती व गांडूळ खत निर्मितीसाठी अनुदान प्राप्त झाले आहे. राज्य शासनाकडून 1 वर्षामध्ये अतिशय चांगल्या सेंद्रिय शेती जोपासल्यामुळे या गटाला पी.जी.एस. मानांकनसुद्धा मिळाले आहे. या गटामध्ये 25 शेतकर्‍यांचा सहभाग असून त्यांनी आपापल्या शेतामध्ये सेंद्रिय शेती फुलविली आहे. या सेंद्रिय शेतीस प्रकल्प संचालक व्ही.एम. बरबडे, तालुका सहायक तंत्रज्ञान विलास भोसले, सहायक तंत्रज्ञान व्ही.डी. माने यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभत आहे. फक्त सेंद्रिय खताचा वापरून दत्तात्रय लिंगे व मोहन कदम यांनी लागवड केलेल्या डाळिंब, मिरची, गवार, प्लॉवर, कोबीमुळे माळरान हिरवेगार दिसत आहे.

या सेंद्रिय शेतीमध्ये  गाईचे शेण व गोमुत्राचा प्रामुख्याने वापर करून शेतामध्ये विविध फळबागांबरोबर वांगी, फ्लॉवर, टोमॅटो, गवार, मिरची, काकडी, भेंडी इत्यादी पालेभाजेचे उत्पादन घेण्यास सुरुवात केली आहे. त्याचबरोबर भाजीपाल्यावर किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गांडुळ खत, पेंडयुक्त खत, निंबोळी खत, जीवाणू खत यांचा वापर केला जात आहे.  पहिल्या वर्षी उत्पादन कमी प्रमाणात होत असले तरी खर्चाच्या तुलनेत दीडपट भाव मिळत आहे. त्याचबरोबर सेंद्रिय शेतीमध्ये उत्पादीत पालेभाज्या लोकांना मिळाव्यात म्हणून भाळवणी येथे लवकरच स्टॉल उभारून किरकोळ विक्री केली जाणार आहे. या गट शेतीपासून प्रेरणा घेऊन भाळवणी परिसरात आणखीनही काही शेतकरी एकत्रीत येऊन सेंद्रिय शेती करण्यासाठी प्रयत्न करू लागले आहेत.