Fri, Jul 19, 2019 13:37होमपेज › Solapur › सोलापुरात रुजतेय अवयवदानाची पवित्र चळवळ

सोलापुरात रुजतेय अवयवदानाची पवित्र चळवळ

Published On: Aug 13 2018 1:21AM | Last Updated: Aug 12 2018 8:58PMसोलापूर : बाळासाहेब मागाडे

जिवंतपणी तसेच मृत किंवा ब्रेनडेड व्यक्तीचे अवयवदान केले जाऊ शकते. मात्र अवयवदानाविषयी  अजूनही पुरेशा प्रमाणात प्रबोधन झाले नसल्याने अवयवदानाची ही चळवळ गतिमानतेच्या प्रतिक्षेत आहे. सोलापुरात मागील दोन वर्षांच्या कालावधीत एकूण दहा ग्रीन कॉरिडॉरद्वारे यकृत, हृदय, किडनी, डोेळे, त्वचा आदींचे अवयवदान करण्यात आले आहे. 

देशात प्रती दशलक्षामागे अवयवदानाचे प्रमाण केवळ 0.26 टक्के आहे. प्रत्येक धर्मात दानाला महत्त्व आहे, त्यामुळे देहदान हे सर्वश्रेष्ठ दान मानले जाते. जिवंत व्यक्तीचे यकृत, किडनी व स्वादुपिंडाचा भाग दान केला जाऊ शकतो. मृत व्यक्तीचे नेत्रपटल व त्वचा दान केली जाऊ शकते. तर ब्रेनडेड व्यक्तीचे हृदय, लिव्हर, फुफ्फुसे किडनी, स्वादुपिंड, आतडे, नेत्रपटल, हृदयाच्या झडपा, त्वचा, हाडे, स्नायुबंध व रक्तवाहिन्या हे अवयव दान केले जाऊ शकतात. 

अपघात किंवा इतर कारणांमुळे रुग्णाचा मेंदू मृत झाला असेल परंतु हृदय सुरु असेल तर व्हेंटीलेटरद्वारे त्या व्यक्तीचे इतर अवयव जिवंत ठेवले जातात. अशा व्यक्तीच्या अवयवांचे इतर गरजू रुग्णांमध्ये प्रत्यारोपण करता येते. यासाठी लोकांमध्ये जागृती निर्माण होणे व अवयव दानाविषयी ज्या गैरसमजुती आहेत त्या दूर होणे आवश्यक आहे. 

महिन्याला दीड लाख डायलेसिस
धकाधकीच्या जीवनामुळे तसेच इतर कारणांमुळे किडनी निकामी होण्याचे प्रमाण वाढले आहे. किडनीच्या आजारामुळे त्रस्त असलेल्या राज्यातील सुमारे दीड लाख रुग्णांना डायलेसिस करावे लागत असल्याची माहिती जे.जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने यांनी सोलापुरात एका कार्यक्रमात बोलताना दिली होती. दोन्ही किडन्या निकामी झालेले हजारो रुग्ण सध्या किडनीच्या प्रतिक्षेत असून अवयवदानाबाबत व्यापक प्रबोधन झाल्यास गरजूंवर किडनी प्रत्योरोपण करून त्यांचा जीव वाचविणे शक्य होणार आहे.

ओळखपत्रावर उल्लेख कधी?
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या ओळखपत्रावर नाव, इयत्ता, वय, रक्तगट आदींचा उल्लेख असतो. याच धर्तीवर ओळखपत्रावर अवयवदानास  इच्छुक असल्याचा उल्लेख करावा, यासाठी वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचनालयाने राज्याच्या तंत्र व शिक्षण विभागाला लेखी पत्र लिहिले असून याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही.

 तंत्र व शिक्षण विभागाकडून याबाबत आदेश पारित होताच  राज्यातील सर्व शासकीय व खासगी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या ओळखपत्रावर अवयवदानाबाबतचा उल्लेख केला जाणार आहे. याच धर्तीवर केंद्रीय वाहतूक मंत्रालयाकडून ड्रायव्हिंग लायसेन्सवरही अवयवदानास इच्छुक असल्याबाबतचा मजकूर मुद्रित करण्याबाबत विचार सुरु आहे. शासनाकडून या दोन्ही पातळ्यांवर अवयवदानाचे उल्लेख बंधनकारक केल्यास ही चळवळ अधिक गतिमान होण्यास मदत होणार आहे. 

सोलापुरात आज विविध उपक्रम
जागतिक अवयवदान दिनाचे औचित्य साधून सोमवार, 13 रोजी इंडियन मेडिकल असोसिएशन व देहांगदान जीवनदान समाजसेवी संस्थेतर्फे आयएमए हॉलमध्ये सायंकाळी 6 वाजता चर्चासत्र होईल. डॉ. वैशंपायन महाविद्यालयातर्फे सकाळी 9 वा. रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.

व्यापक सामाजिक प्रबोधनाची गरज
अवयवदानाबाबत समाजात म्हणावे तेवढ्या प्रमाणात प्रबोधन झालेले नाही. अपघातानंतर ब्रेनडेड झालेले अनेक रुग्ण काही काळानंतर मृत पावतात. मात्र असे रुग्ण जिवंत असेपर्यंत त्यांच्या अवयवदानाबाबत रुग्णांच्या नातेवाईकांनी निर्णय घेणे गरजेचे असते. शाळा, महाविद्यालये, खासगी आस्थापने तसेच समाजात याबाबत व्यापक प्रबोधन करण्याची गरज असल्याचे दिसून येत आहे.