Sat, Apr 20, 2019 16:19होमपेज › Solapur › ‘ईबीसी’ विद्यार्थ्यांकडून पन्नास टक्के फी घेण्याचे विद्यापीठाचे आदेश

‘ईबीसी’ विद्यार्थ्यांकडून पन्नास टक्के फी घेण्याचे विद्यापीठाचे आदेश

Published On: Jul 09 2018 1:08AM | Last Updated: Jul 08 2018 8:35PMसोलापूर : प्रतिनिधी

आर्थिक मागास प्रवर्गाच्या (ई.बी.सी) विद्यार्थ्यांकडून 50 टक्केच शैक्षणिक फी घेण्याचे आदेश सोलापूर विद्यापीठ प्रशासनाने संबंधित सर्व महाविद्यालयांना नुकतेच दिले आहेत. त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

राज्य शासन छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेंतर्गत मराठा समाजातील आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या विद्यार्थ्यांची 50 टक्के शैक्षणिक फी भरणार आहे. त्यामुळे ई.बी.सी. प्रवर्गातील विद्यार्थ्यांकडून महाविद्यालयांनी 50 टक्केच फी घ्यावयाची आहे. मात्र काही महाविद्यालयांनी शंभर टक्के फी घेतल्याची चर्चा होती. यावर मराठा समाजाच्या पदाधिकार्‍यांनी विद्यापीठाकडे तक्रार केली होती. 

या तक्रारीची दखल कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस व कुलसचिव डॉ. गणेश मंझा यांनी घेतली असून, संबंधित सर्व महाविद्यालयांना लेखी परिपत्रकाद्वारे आदेश दिले आहेत.
ज्या महाविद्यालयांनी ई.बी.सी.धारक विद्यार्थ्यांकडून 100 टक्के फी घेऊन प्रवेश दिले आहेत. त्या विद्यार्थ्यांची 50 टक्के फी परत करण्यासही सांगितले आहे. तसेच सध्या सुरू असलेल्या प्रवेश प्रक्रियेत 50 टक्के फी घेऊन विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहेत आणि जे महाविद्यालय नियम पाळणार नाहीत, त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा विद्यापीठाने दिला आहे.

याबद्दल सकल मराठा समाजाच्यावतीने उच्च शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे दाद मागितली होती. विद्यापीठ प्रशासनाने याबाबत तातडीने पावले उचलून ई.बी.सी. धारक विद्यार्थ्यांना छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे. सर्व विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे. यावर समाधानी असल्याचे एनएसयूआयचे अध्यक्ष गणेश डोंगरे यांनी सांगितले.