Sun, Aug 25, 2019 19:01होमपेज › Solapur › दुधनीत भाजप-काँग्रेस आमने-सामने

दुधनीत भाजप-काँग्रेस आमने-सामने

Published On: Mar 04 2018 1:38AM | Last Updated: Mar 03 2018 9:00PMअक्कलकोट : वार्ताहर

दुधनी (ता. अक्कलकोट) येथील नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेतील विषयपत्रिकेमध्ये असलेल्या 19 पैकी 11 विषयांना सत्ताधारी व विरोधकांनी एकमताने मंजुरी दिली, तर विषय क्रमांक 6 चर्चेला येताच भाजप व काँग्रेसच्या नगरसेवकांमध्ये एकच गोंधळ उडाला. यामुळे ही सर्वसाधारण सभा वादळी ठरली.

बुधवार, 28 फेब्रुवारी रोजी दुधनी नगरपरिषदेच्या सभागृहात नगराध्यक्ष भीमाशंकर इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी 11 ते दु. 1.30 यावेळेत सर्वसाधारण सभा पार पडली. सभेसमोरील असलेल्या विषयपत्रिकेमधील विविध प्रकारचे 19 विषय होते. त्यापैकी 14 व्या वित्त आयोगामधून आलेल्या अनुदानातून घ्यावयाची कामे, बोरी नदीतील विहिरीचे अपूर्ण काम पूर्ण करणे, गावातील सर्व बोअरच्या स्टार्टना बॉक्सपेटी बसविणे, अभिलेख कक्ष अद्ययावत करणे, स्वच्छ सर्व्हेक्षण अंतर्गत स्वच्छतेची कामे करणे, शहरात पाणीपुरवठा करणार्‍या पाईपलाईनला लागलेल्या विविध ठिकाणच्या गळतीची दुरस्ती करणे, अग्निशामक वाहनासाठी बॅटरी खरेदी करणे, आरोग्य विभागाचे ट्रॉली दुरुस्त करणे अशा विविध प्रकारच्या 11 विषयांना एकमताने सत्ताधारी व विरोधकांनी मंजुरी दिली. त्यापैकी 8 विषय कायद्यातील तरतुदी तपासून मंजूर-नामंजूर करण्याची प्रक्रिया प्रशासनानी चालू ठेवलेली आहे. विषय क्र. 6 सभेसमोर चर्चेस येताच सत्ताधारी व विरोधकांमध्ये एकच खडाजंगी झाली. 

यावेळी उपनगराध्यक्ष विजयकुमार मानकर, नगरेसवक सातलिंगप्पा म्हेत्रे, सोमनाथ ठक्का, अब्दुल जब्बार मोमीन, शिवानंद माड्याळ, महेश पाटील, अतुल मेळकुंदे, नगरसेविका सुशीला गोटे, श्रीदेवी बसवनकेरी, सुवर्णा पाटील, सुनंदा चिंचोळी, ललिता गद्दी, संगीता पाटील, अन्नपूर्णा पाटील, सुषमा धल्लू यांच्यासह स्वीकृत नगरसेवक उदयकुमार म्हेत्रे, चांद हिप्परगी, मुख्याधिकारी शीला पाटील आदी उपस्थित होते.

तीव्र आंदोलनाचा इशारा

विषय क्र. 6 मध्ये काँग्रेसचे नगरसेवक उदय म्हेत्रे यांनी नगरपरिषद सभागृहास ज्येष्ठ नगरसेवक सातलिंगप्पा म्हेत्रे यांचे नाव देण्याची मागणी केली होती. ते विषय चर्चेला येताच भाजपचे नगरसेवक महेश पाटील यांनी हरकत घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शातंलिंगेश्‍वर महास्वामीजी, स्व. राष्ट्रपती अब्दुल कलाम अशा महापुरुषांचे नाव देण्याची सूचना मांडली. त्यास हरकत घेत म्हेत्रे यांनी सातलिंगप्पा म्हेत्रे यांचेच नाव देण्याची उपसूचना मांडली. उपसूचना मांडताच 12 विरुध्द 3 मतांनी ठराव पारित करण्यात आला. यामुळे काही वेळ सभागृहात विरोधक व सत्ताधार्‍यांमध्ये ‘तू-तू मै-मै’ झाले. याबाबत महेश पाटील यांनी जिल्हाधिकारी सोलापूर यांच्याकडे लेखी तक्रार दाखल करुन महापुरुषांचे नाव न दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्या पत्रामध्ये दिलेला आहे.

ठराव मंजूर झाला आहे

काँग्रेसकडून विषय क्र. 6 मध्ये या सभागृहास सातलिंगप्पा म्हेत्रे यांचे नाव देण्याची पत्र देण्यात आले होते. ते विषय चर्चेत येताच भाजपच्या नगरसेवकांनी हरकत घेत महापुरुषांचे नाव देण्याची मागणी केली. त्यास उपसूचना नगरसेवक उदय म्हेत्रे यांनी मांडून 12 विरुध्द 3 मताने ठराव मंजूर झाल्याची माहिती मुख्याधिकारी शीला पाटील यांनी दिली. 

कायद्यानुसार ठराव आवश्यक

नियमानुसार या सभागृहास ज्येष्ठ नगरसेवक सातलिंगप्पा म्हेत्रे यांचे नाव देण्याची मागणी काँग्रेस गटाकडून करण्यात आली होती. त्यास भाजपवाल्यांनी विरोध केला आहे. यापूर्वीसुध्दा न.प.मध्ये एकमुखीच्या ठरावाआधारे म्हेत्रे यांचे तैलचित्र लावलेले काढण्याची मागणी भाजपवाल्यांनी केली होती. एखादे नाव देणे किंवा तैलचित्र लावणे यासाठी कायद्यानुसार बहुमताचा ठराव होणे आवश्यक असते. त्यानुसारच आम्ही केलेले आहे. विविध महापुरुषांच्या नावाचे विविध विभागांना नाव देण्यात आलेले आहे, अशी प्रतिक्रिया स्वीकृत नगरसेवक उदय म्हेत्रे यांनी दिली. 

जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार करणार
काँग्रेसच्या नगरसेवकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ.एपीजे अब्दुल कलाम, शांतलिंगेश्‍वर महास्वामीजी या महापुरुषांच्या नावास विरोध करीत स्वत:चे नाव सभागृहास देण्यासाठी बहुमताच्या आधारे हट्ट धरले आहे. याविरोधात आम्ही जिल्हाधिकारी सोलापूर यांच्याकडे लेखी तक्रार केलेली आहे. याचा विचार न झाल्यास आम्ही तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा नगरसेवक महेश पाटील यांनी दिला आहे.