Wed, Jul 24, 2019 08:03होमपेज › Solapur › होम मैदानावर फक्‍त गड्डा यात्राच भरणार

होम मैदानावर फक्‍त गड्डा यात्राच भरणार

Published On: Aug 29 2018 1:44AM | Last Updated: Aug 29 2018 12:01AMसोलापूर : प्रतिनिधी  

शहरातील होम मैदानावर आता फक्त सिद्धेश्‍वर अर्थात गड्डा यात्राच भरणार असून येथून पुढे तेथे कोणतेही सार्वजनिक कार्यक्रम, सभा, प्रदर्शने भरविता येणार नाहीत. यात्रा सोडून इतर कार्यक्रमांसाठी देगाव रस्ता परिसरातील लक्ष्मी-विष्णू गिरणीच्या महापालिकेच्या जागेत पर्यायी व्यवस्था करण्यात आल्याची माहिती उपमहापौर शशिकला बत्तुल यांनी दिली. 

मंगळवारी दुपारी देगाव रस्ता परिसरातील लक्ष्मी-विष्णू गिरणीच्या महापालिकेच्या जागेची पाहणी पालिका आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे, महापौर शोभा बनशेट्टी, उपमहापौर शशिकला बत्तुल, सभागृहनेते संजय कोळी, विरोधी पक्षनेते महेश कोठे, बसपाचे गटनेते आनंद चंदनशिवे, नगरसेवक गणेश पुजारी, नगरसेवक श्रीनिवास करली, नगररचना सहाय्यक  संचालक लक्ष्मण चलवादी यांनी पाहणी केली.

फक्त यात्राच भरणार
होम मैदान हे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असल्याने गेल्या अनेक वर्षांपासून तेथे राजकीय सभा, सांस्कृतिक कार्यक्रम, विविध प्रदर्शने व इतर खासगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत होते. यातून महापालिकेला मोठे आर्थिक उत्पन्नही मिळत होते. मात्र ‘स्मार्ट सिटी’च्या कामास प्रारंभ झाल्यापासून हरिभाई देवकरण प्रशालेचा रस्ता पूर्णपणे वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला. त्यामुळे तेव्हापासून मैदानावर कोणतेही कार्यक्रम झाले नाहीत. अशातच विविध सभा व कार्यक्रमांसाठी होम मैदानाची जागा देण्याची मागणी करण्यात येत होती. महापालिकेने परवानगी दिल्याने अनेकांची नाराजी होती. यावर कायमचा मार्ग काढण्याची मागणी सत्ताधारी व विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी पालिका प्रशासनाकडे केली होती. त्यानुसार मंगळवारी पालिका पदाधिकार्‍यांनी होम मैदान व लक्ष्मी-विष्णू गिरणीच्या मैदानाची पाहणी करुन हा निर्णय घेतला. 

पर्यायी जागा सोयीची
होम मैदानावर यात्रा सोडून होणारे इतर कार्यक्रम घेण्यासाठी आता लक्ष्मी-विष्णू गिरणीच्या मैदानावर परवानगी देण्यात येणार आहे. हे मैदान 56 हजार चौरस फुटांचे आहे. 40 हजार चौरस फूट व 16 हजार चौरस फूट अशा दोन तुकड्यांत हे मैदान आहे. यातील 16 हजार चौरस फुटाची जागा ही रेल्वे रुळाच्या पलीकडे येत असल्याने ती गैरसोयीचे आहे. त्यावर मार्ग काढण्यासाठी 40 हजार चौरस फुटाच्या जागेला लागून शेजारी मोकळी असलेली खासगी जागा पालिका विकत घेणार आहे. या जागेच्या भाड्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे.
या जागेवर झालेली अतिक्रमणे तत्काळ काढण्याच्या सूचना आयुक्‍त डॉ. ढाकणे यांनी यावेळी दिल्या.