Wed, Jun 26, 2019 17:27होमपेज › Solapur › जिल्हा परिषदेचा केवळ 9 टक्केच निधी खर्च 

जिल्हा परिषदेचा केवळ 9 टक्केच निधी खर्च 

Published On: Aug 12 2018 1:03AM | Last Updated: Aug 11 2018 8:55PMसोलापूर : संतोष आचलारे

जिल्हा परिषदेला सन 2017-18 व 2018-19 या वर्षाकरीता एकूण 243 कोटी 39 लाख रुपयांचा निधी मंजूर असून यापैकी जूनअखेरपर्यंत केवळ 21 कोटी 91 लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आला असून प्राप्‍त निधीपैकी केवळ 9 टक्केच निधी खर्च झाल्याने प्रशासकीय यंत्रणेची उदासिनता कायम दिसून येत आहे. 

जि.प. प्रशासन, अर्थ व ग्रामपंचायत विभागासाठी एकूण 7 कोटी 64 लाख रुपयांचा निधी मंजूर आहे. यापैकी 59 लाख 99 हजारांचा खर्च झाला असून केवळ 7.84 टक्के निधी खर्च करण्यात आला आहे. प्राथमिक शिक्षण विभागासाठी 34 कोटी 82 लाख रुपयांचा निधी मंजूर असून यापैकी 45 लाख 48 हजारांचा निधी खर्च करण्यात आला आहे. निधीच्या तुलनेत केवळ 1.30 टक्केच निधी खर्च करण्यात आला आहे. 

माध्यमिक शिक्षण विभागाकरिता 7 लाख 50 हजारांचा निधी मंजूर असून हा निधी पूर्णपणे अखर्चित आहे. बांधकाम विभागासाठी 55 कोटी 42 लाख रुपयांचा निधी मंजूर असून यापैकी 5 कोटी 83 लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. निधीच्या तुलनेत या विभागाचा खर्च 10.52 टक्के इतका झाला आहे. लघुपाटबंधारे विभागास 17 कोटी 76 लाख रुपयांचा निधी मंजूर असून यापैकी 4 कोटी 35 लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. प्राप्‍त निधीच्या 24.52 टक्के इतका खर्च झाला आहे. 

आरोग्य विभागासाठी 16 कोटी 79 लाख रुपयांचा निधी मंजूर असून यापैकी केवळ 49 लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. प्राप्‍त निधीच्या तुलनेत या विभागाचा खर्च केवळ 2.97 टक्केच असल्याने या विभागावर टीका होत आहे. ग्रामीण पाणीपुरवठा विभागास 16 कोटी 9 लाख निधी मंजूर असून यापैकी 64 लाख 47 हजारांचा निधी खर्च करण्यात आला आहे. मंजूर निधीच्या तुलनेत या विभागाचा खर्च 6.32 टक्के इतका झाला आहे. 

कृषी विभागासाठी 10 कोटी 8 लाख निधी मंजूर असून यापैकी 1 कोटी 9 लाख निधी खर्च करण्यात आला आहे. निधीच्या तुलनेत 10.83 टक्के खर्च झाला आहे. पशुसंवर्धन विभागाकरिता 6 कोटी 85 लाख निधी मंंजूर असून यापैकी 18 लाख 95 हजार इतका खर्च झाला आहे. मंजूर निधीच्या तुलनेत या विभागाचा केवळ 2.77  टक्केच निधी खर्च झाला आहे. 

समाजकल्याण विभागाकरिता 66 कोटी 70 लाख निधी मंजूर असून यापैकी 7 कोटी 57 लाख निधी खर्च करण्यात आला आहे. मंजूर निधीच्या तुलनेत या विभागाचा खर्च 11.35 टक्के इतका झाला आहे. महिला व बालकल्याण विभागासाठी 7 कोटी 11 लाख निधी मंजूर असून यापैकी 2 लाखच निधी खर्च करण्यात आला आहे. मंजूर निधीच्या तुलनेत केवळ 0.28 टक्के इतका सर्वात कमी खर्च या विभागाचा झाला आहे. जिल्हा परिषद सेसफंडातून मंजूर असलेल्या 46 कोटी 49 लाख रुपयांच्या निधीपैकी केवळ 1 कोटी 91 लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आला असून या योजनेतील केवळ 4.26 टक्केच निधी खर्च करण्यात जि.प. पदाधिकारी व अधिकार्‍यांना यश आले आहे. 

कोट्यवधीच्या निधीचा हिशोबच नाही

सर्वशिक्षा अभियान, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान, पंतप्रधान आवास योजना, स्वच्छ भारत मिशन आदी योजनांसाठी जिल्हा परिषदेकडून कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करण्यात येतो. मात्र या खर्चाचा कोणताही तपशील जि.प. मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांच्याकडे असल्याचे दिसून येत नाही. कोट्यवधी रुपयांचा खर्च करणार्‍या विभागास कोणाचेच आर्थिक नियंत्रण नसल्याने या विभागाच्या कारभाराबाबत संशय निर्माण होत आहे.