Fri, Mar 22, 2019 00:01
    ब्रेकिंग    होमपेज › Solapur › ऑनलाईन महसूल खाते झाले ऑफलाईन

ऑनलाईन महसूल खाते झाले ऑफलाईन

Published On: Jun 12 2018 12:54AM | Last Updated: Jun 12 2018 12:03AMबेंबळे : वार्ताहर

सातबारा उतारा म्हणजे महसूल विभागाचा व शेतकर्‍यांचा जीव की प्राण. पण हाच उतारा गेल्या 15 दिवसांपासून सर्व्हर बंद झाल्यामुळे निघणे व विविध प्रकारच्या नोंदी घेणे, करणे बंद झाले आहे. त्यामुळे शासन व प्रशासन डिजिटल झाल्याचा जो गवगवा महसूल विभागाकडून केला गेला. या प्रकाराने त्याला खो बसला आहे. ऑनलाईन झालेला महसूल विभाग ऑफलाईन झाल्यामुळे तलाठी, सर्कल हतबल झाल्याचे चित्र ग्रामीण भागात निर्माण झाले आहे.

शासनाने डिजिटल इंडियाची घोषणा केली. त्यासाठी खूप प्रयत्न केले. ऑफलाईन असलेली सर्व यंत्रणा ऑनलाईन करुन एका क्लिकवर आणली. हाताने उतारे लिहून देणार्‍या तलाठ्यास लॅपटॉप मिळाले. पण हे सोईचे होण्यापेक्षा गैरसोईचेच जास्त झाले. उतारे, विविध दाखले मागणार्‍या शेतकर्‍यांना सर्व्हर बंदच्या कारणामुळे हेलपाटे मारावे लागत आहेत.
सध्या गेल्या पंधरा दिवसांपासून सर्व सिस्टीम ऑफलाईन झाल्यामुळे सगळीच कामे बंद पडली आहेत.खरेदी-विक्री, नोंद घेणे, हक्क सोड, बोजा नोंदवून घेणे, त्याचे उतारे देणे या प्रक्रिया बंद पडल्यामुळे भाऊसाहेबांना केवळ हातावर हात ठेवून बसण्याशिवाय काहीच काम राहिले नाही.

याबाबत टेंभुर्णी मंडलाधिकारी पी. के. बांगर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, मागील पंधरा दिवस सर्व्हर बंद असल्यामुळे आम्हाला काहीच करता येत नाही. दोन दिवसांत सातबारा, आठ अ हे उतारे मिळण्यास सुरुवात होईल, पण नोंदी घेणे सध्या बंदच आहे.या कारणामुळे माढा तालुक्यातील हजारो शेतकर्‍यांची कर्जप्रकरणे करता येईनात, बोजा नोंदवून घेणेच होत नसल्याने बँकांची कर्जप्रकरणे मंजूर होत नसल्याने शेतातील अनेक कामे खोळंबली आहेत.

ऑनलाईन होण्याअगोदर रावसाहेबांची सही राहिली, या नावाखाली अर्थपूर्ण व्यवहार झाल्याशिवाय काम होत नसायचे.परंतु  आता सर्व्हर बंदचे आयते कारण मिळाल्याने आणखी उशीर होत आहे. मात्र ते काम केले की ऑफलाईन असलेली सिस्टीम ऑनलाईन होते.हा अनुभव अनेकांना अनेकदा आला आहे, तातडीने हा सर्व्हर चालू करुन सर्व प्रक्रिया चालू करावी अन्यथा शेतकर्‍यांमधून तीव्र आंदोलन उभे करण्याचा इशारा दिला आहे.