Thu, May 28, 2020 23:14होमपेज › Solapur › ‘धाडस’ शरद कोळी तडीपारीला मिळाली  एक वर्षाची स्थगिती 

‘धाडस’ शरद कोळी तडीपारीला मिळाली एक वर्षाची स्थगिती 

Published On: Apr 25 2018 11:55PM | Last Updated: Apr 25 2018 10:45PM
सोलापूर : प्रतिनिधी
सामाजिक कार्यकर्ता आणि वाळू माफियांविरोधात तक्रारी देत नेहमीच चर्चेत असलेला ‘धाडस’ संघटनेचा प्रमुख शरद कोळी (रा. अर्धनारी, ता. मोहोळ) यास उच्च न्यायालयाने या प्रकरणाची पुढील सुनावणी होईपर्यंत म्हणजे एक वर्षांची स्थगिती दिली आहे. त्यामुळे आता एक वर्षासाठी तडीपारीच्या आदेशाची पोलिसांना अंमलबजावणी करता येणार नाही.  
सुमारे 12 गंभीर गुन्हे दाखल असल्यामुळे पंढरपूरचे उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांनी दोन वर्षांसाठी सोलापूर जिल्ह्यातून शरद कोळी यास तडीपार केले होते. यासंदर्भातील तडीपारीचा आदेश 22 फेब्रुवारीला काढण्यात आला होता. 
सोलापूर जिल्ह्यात विशेषत: भीमाकाठ परिसरात जे वाळू उत्खनन केले जात होते त्या वाळू उत्खननवरुन शरद कोळी हा सातत्याने चर्चेत असे. दोनवेळा वाळू माफियांनी हल्ला केल्यामुळेही तो  चर्चेत होता. गतवर्षी कोळी याच्यावर महिलेचे अपहरण आणि जीवे मारण्याचा प्रयत्न, असा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामुळे तो विशेष चर्चेत आला होता. 
पोलिस अधीक्षक वीरेश प्रभू, अप्पर पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलिस अधिकारी अभय डोंगरे यांनी कोळी याच्यावर वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांत तब्बल 12 गुन्हे दाखल असल्यामुळे येणार्‍या काळात त्याच्याकडून आणखी गंभीर गुन्हे दाखल होण्याची शक्यता गृहित धरून त्याला सोलापूर जिल्ह्यातून तडीपार करण्यासंदर्भातील प्रस्ताव पंढरपूर उपविभागीय अधिकारी यांच्याकडे तयार करून पाठविला होता. या प्रस्तावाला उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांनी  मंजुरी दिली होती. 
त्यानुसार शरद कोळी यास दोन वर्षांसाठी सोलापूर, पुणे आणि सांगली जिल्ह्यांतून तडीपार करण्याचा आदेश पारित करण्यात आला होता.  दरम्यान, तडीपारीचा आदेश बजाविण्यात आल्यानंतर कोळी याने उच्च न्यायालयात याचिका दाखल करून तडीपारीला स्थगिती देण्याची मागणी केली होती. परंतु न्यायालयाने आधी विभागीय आयुक्‍तांकडे अपील करण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर कोळी याने विभागीय आयुक्‍तांकडे रितसर अपील करून आपल्यावर अन्याय झाल्यामुळे आपल्या तडीपारीच्या आदेशाला स्थगिती द्यावी, अशी विनंती केली होती. परंतु विभागीय आयुक्‍त यांनीही हे अपील फेटाळून लावले होते. त्यानंतर परत कोळी याने उच्च न्यायालयात या निर्णयाला आव्हान दिले होते. 
या आर्जावर उच्च न्यायालयाच्या द्विसदस्य खंडपीठापुढे नुकतीच सुनावणी झाली. या तडीपारीच्या प्रकरणात तत्काळ निर्णय प्रक्रिया होईल असे पोलिस दलाला वाटत असतानाच न्यायालयाने याप्रकरणाची पुढील सुनावणी 22 मे 2019 ला ठेवली आहे. त्यामुळे आता शरद कोळी याच्या तडीपारीला पुढील सुनावणी पर्यंत म्हणजे एक वर्षांची स्थगिती मिळाली आहे. 
दरम्यान, पोलिस दलाकडून विशेष सरकारी वकिलांमार्फत न्यायालयाच्या निदर्शनास ही बाब आणून देण्यासाठी प्रयत्न केला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.