Tue, May 26, 2020 23:42होमपेज › Solapur › एक लाख शेतकरी पीक कर्जापासून वंचित!

एक लाख शेतकरी पीक कर्जापासून वंचित!

Published On: Sep 11 2019 2:31AM | Last Updated: Sep 10 2019 10:42PM
सोलापूर  : संदीप येरवडे 

खरीप हंगाम सुरू होऊन तीन महिने झाले तरी अद्याप जिल्ह्यातील बँकांनी केवळ 52 टक्के पीक कर्जाचे वाटप केले आहे. वास्तविक पाहता जिल्ह्यातील 1 लाख 52 हजार 573 शेतकर्‍यांना पीक कर्ज देण्याचे उद्दिष्ट बँकांना देण्यात आले होते. तथापि, केवळ 53 हजार 558 शेतकर्‍यांनाच पीक कर्जाचे वाटप करण्यात आल्याची धक्‍कादायक माहिती हाती आली आहे. तब्बल एक लाख शेतकर्‍यांना पीक कर्जच न मिळाल्याने त्यांना सावकारांच्या दारांत जावे लागले आहे. पीक कर्ज वाटपाबाबत राज्य सरकारने स्पष्ट आदेश देऊनही बँकांनी या आदेशाला हरताळ फासला असल्याचे उघड झाले आहे. 
खरीप पीक कर्ज वाटप करण्याची जबाबदारी जिल्ह्यातील सहकारी व खासगी बँकांच्या 533 शाखांना देण्यात आली होती. त्यातील राष्ट्रीयीकृत 232, खासगी 58, जिल्हा सहकारी बँक 208 व विदर्भ कोकण बँक 35 अशा बँकांच्या शाखांचा समावेश होता. खरीप पीक कर्ज वाटप करण्यासाठी जिल्ह्यासाठी 1 हजार 411 कोटी रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यांपैकी आतापर्यंत 736 कोटी 6 लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. बँकांनी आतापर्यंत 52 टक्के पीक कर्ज वाटप केले. परंतु, निम्म्या शेतकर्‍यांनादेखील अद्याप पीक कर्जाचा लाभ मिळाला नाही. अगोदरच जिल्ह्यातील शेतकरी मागील वर्षाचा दुष्काळ आणि यंदाही पावसाने दडी मारल्यामुळे हवालदिल असताना बँकांकडून शेतकर्‍यांना ठेंगा दाखविला जात आहे. खासगी बँकांनी शंभर टक्क्यांपेक्षा जास्त पीक कर्ज वाटप केले आहे. परंतु, राष्ट्रीयीकृत बँकांना मोठ्या प्रमाणात उद्दिष्ट  देऊनदेखील केवळ 45 टक्केच पीक कर्जाचे वाटप केले गेले आहे. 

शेतकर्‍यांची बँक म्हणून ओळख असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनीदेखील 43 टक्केच पीक कर्ज वाटप केले आहे. 68 हजार शेतकर्‍यांना पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट असताना केवळ 17 हजार शेतकर्‍यांना पीक कर्जाचे वाटप केले आहे. शेतकरी बँकांकडे पीक कर्ज मागणीसाठी गेल्यानंतर अगोदरच बँक अडचणीत आली असल्याची उत्तरे शेतकर्‍यांना देण्यात येत आहेत. त्यामुळे डीसीसी बँकेनेदेखील निम्म्या शेतकर्‍यांनाही पीक कर्ज वाटप केले नाही. एकंदरीत पाहता सर्वच बँकांनी नव्या एकाही शेतकर्‍यांना पीक कर्ज वाटप केले नसल्यामुळे जिल्ह्यातील शेतकर्‍यांना खासगी सावकारांकडून खरीप हंगामासाठी पैसे काढण्याची वेळ आली आहे.

कर्जमाफीमुळे नवीन पीक कर्ज मिळण्यास अडचणी

राज्य सरकारने शेतकर्‍यांची कर्जमाफी केली असल्याचे जाहीर केले आहे. परंतु, नव्या एकाही शेतकरी सभासदाला बँकांनी कर्ज दिले नाही. वर्षानुवर्षे त्याच त्या शेतकर्‍यांना कर्ज दिले जात आहे. नव्या शेतकर्‍यांना कर्ज मिळत नसल्यामुळे अशा शेतकर्‍यांची कुंचबणाच केली जात असल्याचे उघडकीस आले आहे.

---
* पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट : 1 हजार 411 कोटी रुपये
* प्रत्यक्षात कर्ज वाटप : 736 कोटी रुपये
* राष्ट्रीयीकृत बँकांकडून कर्जवाटप : 420 कोटी रुपये
* खासगी बँकेकडून कर्जवाटप : 159 कोटी रुपये
* डीसीसी बँकेकडून कर्जवाटप :  133 कोटी रुपये
* विदर्भ कोकण बँकेकडून कर्जवाटप : 22 लाख रुपये