Sun, Sep 23, 2018 14:30



होमपेज › Solapur ›  महिला प्रवाशाचे दीड लाखांचे दागिने रिक्षाचालकाने केले परत 

रिक्षाचालकाने दीड लाखांचे दागिने केले परत 

Published On: Dec 09 2017 5:56PM | Last Updated: Dec 09 2017 5:56PM

बुकमार्क करा





सोलापूर : प्रतिनिधी  

माणुसकी आणि प्रामाणिकणा आजही लोकांमध्ये जिवंत असल्याचा प्रत्यय शनिवारी सोलापूरकरांना आला. सुरतगावच्या एका ६० वर्षाच्या महिला प्रवाशाचे रिक्षात विसरलेले सुमारे दीड लाखांचे दागिने रिक्षा चालकाने प्रामाणिकपणे परत केल्याची दिलासादायक घटना शनिवारी घडली. नवी वेस चौकीच्या पोलिसांनी पिशवीत राहिलेल्या मोबाईलवरून त्या रिक्षा चालकाला शोधले आणि त्यानेही कोणतेही आढेवेढे न घेता चौकी गाठली आणि दागिने परत करून त्या वृद्ध महिलेविषयी आपला प्रामाणिकपणा दाखवून दिला.

तुळजापूर तालुक्यातील सुरतगाव येथील ६० वर्षाच्या आजीबाई अनुराधा विठ्ठल गुंड या एसटीने सोलापुरात आल्या. सोलापुरातील आमराई परिसरात राहणा-या आपल्या मुलीकडे जाण्यासाठी त्यानी रिक्षाने जायचे ठरविले. एसटी स्टॅन्डपासून शेअर ए रिक्षातून जाण्यासाठी त्यानी एमएच १३जी ७२७८ हि रिक्षा पकडली. रिक्षात चढताना आजीबाईच्या आपल्याजवळील दोन पिशव्या रिक्षात ठेवल्या. भैय्या चौकात एक वाजता त्या उतरल्या.  मात्र लाल रंगाची एक पिशवी रिक्षामध्येच राहिली. 

रिक्षा निघून गेल्यानंतर त्यांना एक पिशवी रिक्षात राहिल्याचे समजताच अनुराधा यांनी तातडीने नवी वेस पोलीस चौकी गाठली. तेथे कॉन्स्टेबल अविनाश शिंदे ड्युटी बजावत होते. अनुराधा यांनी घडलेला प्रकार  शिंदे यांना सांगितला. अनुराधा या घाबरलेल्या असल्याने रिक्षात राहिलेला मोबाईल नंबरहि त्यांना आठवत नव्हता. त्यानी आपले जावई विठ्ठल शिंदे यांचा मोबाईल नंबर सांगितला. शिंदे यांना पोलिसांनी हकीकत सांगितली. आणि शिंदे यांनी त्या आजीबाईंना आपल्या दुचाकीवर बसवून रेल्वे स्टेशन आणि एसटी स्टॅन्ड गाठले. तेथील रिक्षा चालकांशी चर्चा केली. आजीबाईंनाही रिक्षा चालकास ओळखण्यास सांगितले मात्र रिक्षाचालक दिसून आला नाही. याशिवाय बीटमार्शल कॉन्स्टेबल विनोद बनसोडे आणि कॉन्स्टेबल श्रीरंग कुलकर्णी यांनी एसटी स्टॅण्डवर चौकशी केली . 

दरम्यान पोलिसांनी आपल्या मोबाईलवरून रिक्षात विसरलेल्या पिशवीतील संपर्क केला आणि गोरख ध्यानदेव जगदाळे या रिक्षा चालकाने मोबाईल उचलताच त्याला रिक्षासह नवी वेस चौकीस येण्यास सांगितले. तत्पूर्वी रिक्षा चालक आणि त्याच्या पत्नीने आजीबाईंना शोधण्यासाठी बसस्थानक आणि रेल्वे स्थानक गाठले. मात्र आजीबाई दिसून आल्या नव्हत्या. नवी वेसला येताच आजीने रिक्षा आणि चालकालाही ओळखले. येताना चालकासोबत त्याची पत्नीसुद्धा सोबत आली होती. गोरख जगदाळे या चालकाने रिक्षात विसरलेली आजीबाईचा  पिशवी पोलिसांना काढून दिली. आजीचे डोळे पाणावले होते. त्या पिशवीत ३ तोळे सोन्याच्या पाटल्या,दीड तोळे सोन्याचा लक्ष्मी हार , अर्धा तोळे सोन्याचा शेवंती हार आणि रोख १० हजार रुपये असा सुमारे १ लाख ५० हजाराचा ऐवज होता. चौकीचे सहायक पोलीस निरीक्षक जी. बी. पांढरे यांच्यासमोर सर्व सोने आणि रोख रक्कम अनुराधा गुंड यांना सुपूर्द करण्यात आली. 

प्रामाणिकपणा बद्दल आजीबाईंनी रिक्षाचालक गोरख जगदाळे यांना दोन हजार रुपये बक्षीस म्हणून दिले. पोलिसांनीही त्या प्रामाणिक रिक्षाचालकाचा सत्कार करत त्याचे आभार मानले. केवळ शिंदे,बनसोडे,कुलकर्णी या पोलीस कॉन्स्टेबल यांनी तातडीने पाऊले उचलल्याने आणि रिक्षा चालकाने प्रामाणिकपणा दाखविल्यामुळे आपले लाख मोलाचे सोने आपल्याला परत मिळायची प्रतिक्रिया अनुराधा गुंड यांनी व्यक्त केली. सहायक पोलीस निरीक्षक पांढरे यांनीसुद्धा आपल्या कर्माच्या-यांचे कौतुक करत त्याच्या पाठीवर शाबासकीची थाप मारली.