Sat, Nov 17, 2018 02:40होमपेज › Solapur › जागेच्या कारणावरुन मायलेकींना मारहाण; पाच जणांवर गुन्हा दाखल

जागेच्या कारणावरुन मायलेकींना मारहाण; पाच जणांवर गुन्हा दाखल

Published On: Sep 02 2018 1:49AM | Last Updated: Sep 01 2018 6:11PMमोहोळ : प्रतिनिधी 

घर जागेच्या कारणावरून लोखंडी पाईप आणि दगडाने झालेल्या हाणामारीत एक महिला गंभीर जखमी झाली. लक्ष्मी मारुती कांबळे (रा.पेनूर ता. मोहोळ) असे जखमी महिलीचे नाव आहे. या प्रकरणी आज, शनिवार (दि.१ सप्टेंबर) रोजी मोहोळ पोलीसात पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. 

याबाबत सविस्तर वृत्त असे की, पेनूर ता. मोहोळ येथील लक्ष्मी कांबळे व त्यांची मुलगी सुजीता या दोघी मायलेकी २९ ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास घरासमोर बसल्या होत्या. यावेळी त्यांनी गावातील जनाबाई निंबाळकर, गणेश लक्ष्मण निंबाळकर, लक्ष्मण निंबाळकर, दत्ता पवार, मुत्तेलीबाई दत्ता पवार यांना "आमच्या दोन गुंठे जागेवर अतिक्रमण का केले अशी विचारणा केली. त्यावेळी निंबाळकर आणि पवार कुंटुंबीयांनी या दोघी मायलेकींना लोखंडी पाईप, आणि दगडाने मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीत लक्ष्मी कांबळे या गंभीर जखमी झाल्या होत्या. स्थानिक नागरीकांनी कांबळे यांना उपचारासाठी सोलापूर येथील शासकीय रूग्णालयात दाखल केले. तेव्हापासून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत.

यासंबंधी सुजीता यांनी मोहोळ पोलिसांत तक्रार दिली होती.  या तक्रारीनुसार मोहोळ पोलीसात जनाबाई निंबाळकर, गणेश लक्ष्मण निंबाळकर, लक्ष्मण निंबाळकर, दत्ता पवार, मुत्तेलीबाई दत्ता पवार (सर्व रा.पेनूर ता. मोहोळ) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास मोहोळ पोलिस करीत आहेत.