Tue, Jun 02, 2020 20:45होमपेज › Solapur › गूगलकडून आंतरराष्ट्रीय ब्लॉगर म्हणून सोलापूरच्या ओंकारची निवड

गूगलकडून आंतरराष्ट्रीय ब्लॉगर म्हणून सोलापूरच्या ओंकारची निवड

Published On: Aug 13 2018 11:36PM | Last Updated: Aug 13 2018 11:36PMसोलापूर : प्रतिनिधी

आंतरराष्ट्रीय ब्लॉगर म्हणून जगातील 30 ब्लॉगरमधून गूगलने सोलापूरच्या ओंकार जंजीरालची निवड केली आहे. त्याचा सत्कार अमेरिकेत 15 ऑगस्ट रोजी गूगलचे सीईओ सुंदर पिचई यांच्या हस्ते होणार आहे.

संभाजीराव शिंदे विद्यामंदिर संचलित मातोश्री गंगुबाई केकडे ज्युनिअर कॉलेज, विडी घरकुल येथे विज्ञान शाखेत ओंकार जंजीराल शिकत आहे. त्याची गूगल आंतरराष्ट्रीय ब्लॉगर म्हणून निवड झाली आहे. गूगलने ओंकारला तातडीने  अमेरिकेला बोलावले आहे. सिलिकॉन व्हॅली या शहरात 15 ऑगस्ट 2018 रोजी गूगलचे सीईओ सुंदर पिचई यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमासाठी भारतातील टॉप 30, महाराष्ट्रातील टॉप 3 आणि सोलापुरातून एकमेव टॉप ब्लॉगर म्हणून गूगलने ओंकारची निवड केली आहे. त्यासाठी तो अमेरिकेला रवाना होत आहे. विशेष म्हणजे, अमेरिकेला येण्या-जाण्याचा खर्च गूगल करणार आहे.

लहानपणीच आई-वडिलांचे अपघाती निधन झाले. ओंकारचे पालनपोषण त्यांच्या आजी-आजोबांनी केले आहे. पाचवीला असताना ओंकारने स्वतःची वेबसाईट तयार केली आहे. इंटरनेटच्या माध्यमातून त्याने ब्लॉगवर लिहिण्यास सुरुवात केली. ‘भारतीय मसाले’ या विषयावर त्याने लिहिलेल्या ब्लॉगला जास्त पसंती मिळाली आहे. आजतागायत ओंकारने 3 हजार ब्लॉग लिहिले आहेत. भविष्यात गुगलसोबत डिजिटल मार्केटिंग करण्याचा मानस ओंकार जंजीराल याने व्यक्त केला आहे. तरुणांनी सोशल मीडियावर वेळ घालवण्यापेक्षा इंटरनेटचा चांगला वापर केल्यास करिअर घडू शकते, असेही ओंकारने यावेळी सांगितले.
संभाजी शिंदे विद्यामंदिरच्यावतीने ओंकारचा सत्कार करून त्यास पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.