Tue, Jul 23, 2019 10:32होमपेज › Solapur › रोजगार हमी योजनेच्या जन्माचा रक्तरंजित इतिहासतील हुतात्मांना श्रद्धांजली अर्पण

रोजगार हमी योजनेच्या जन्माचा रक्तरंजित इतिहासतील हुतात्मांना श्रद्धांजली अर्पण

Published On: Sep 06 2018 7:49PM | Last Updated: Sep 06 2018 7:49PMवैराग : प्रतिनिधी 

ज्या रोजगार हमीच्या कायद्याने गोरगरीबकष्टकऱ्यांना चार घास हक्काचे आणि कष्टाचे मिळाले. त्या कायद्याचे मुळ मात्र रक्तरंजित इतिहासाने न्हाऊन निघाले आहे. हा कायदा होण्यापूर्वी वैरागमध्ये आठ हुतात्मांना प्राणाची आहुती द्यावी लागली होती. आज या घटनेला ४७वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने वैराग मध्ये त्या आठ हुतात्म्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.

१९७१-७२ साली भयानक दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी लोकांना काम नव्हते, कामाला दाम नव्हता, खायला धान्य नव्हते. त्यामुळे लोकांची मोठया प्रमाणावर उपासमार चालू होती. त्या काळी पाणी भरपूर होते पण काम आणि धान्य यांचा तुटवडा होता. परीणाम एका एका धान्याच्या कणांसाठी लोकांना तरसावे लागत होते. दिवसेंदिवस परिस्थिती बिकट बनत चालली असतानाच शासनाने वैरागच्या शासकीय धान्य गोदामात मुबलक धान्यसाठा ठेवला असल्याचे समजले. म्हणून शेतकरी कामगार पक्षाचे भाई कै.चंद्रकांतनाना निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी "हाताला काम दया, कामाला दाम दया, धान्य दया " या मागणीसाठी भव्य मोर्चा काढला. या मोर्चा मध्ये भाई सर्जेराव सगर, भाई एस एम् पाटील, भाई ज्ञानेश्वर पाटील यांच्यासह लाखों कष्टकऱ्यांनी सहभाग नोंदवला होता.६ सप्टेंबर १९७१ रोजी निघालेल्या या भव्य मोर्चावर शासकीय गोदामामध्ये बंदोबस्तासाठी नेमलेल्या तत्कालीन डेमला नावाच्या पोलीस अधिकाऱ्याने आंदोलनकर्त्यांवर बेछूट गोळीबार केला. यामध्ये वैराग भागातील आठ हुतात्मे शहीद झाले. यामध्ये कै .एकनाथ ज्योती साळुंके (वैराग), कै इब्राहीम चाँदसो शेख (वैराग),कै .सौ. सुंदराबाई लक्ष्मण चव्हाण (वैराग),कै .बब्रुवान तुळशीराम माळी ( मानेगाव ),कै. भास्कर बाबुराव वाळके ( मानेगाव ),कै. रघुनाथ श्रीपती माने (रातंजण ), कै.उद्धव श्रीपती गोफण (हळदुगे), कै.चतुर्भुज विठ्ठल ताकभाते ( श्रीपत पिंपरी ) अशा आठ हुतात्मांचा समावेश आहे. यावेळी झालेल्या अमानुष गोळीबार प्रकरणामुळे आणि आठ हुतात्मांच्या बालिदानामुळे शासन खडबडून जागे झाले, आणि त्यांना गोरगरीब कष्टकरी जनतेसाठी रोजगार हमीची योजना अंमलात आणावी लागली. पुढे हा कायदा अस्तित्वात येऊन राज्यातून देशभर लागू करण्यात आला. वैरागमध्ये हुतात्मा झालेल्या आठ जणांमुळे संपूर्ण देशाला रोजगार हमीचा कायदा मिळाला. त्या आठ हुतात्मांच्या स्मृती वैरागमधील हुतात्मा स्मारक येथे जागवण्यात आल्या.यावेळी मूकमोर्चाने येवून हुतात्मा स्मारकामध्ये श्रद्धाजंली अर्पण करण्यात  आली.यावेळी भाई सुभाष डुरेपाटील,  कॉ .तानाजी ठोबरे ,माजी सरपंच संतोष निंबाळकर,  भाई जीवाजीराव पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य वासुदेव गायकवाड, पिंटू घोडके ,सुनिल पवार, मोहन घोडके , मेजर वासुदेव जगताप,  माजी सभापती बापूसाहेब बुरगुटे , माजी सभापती भाऊसाहेब काशिद , माजी उपसभापती केशव घोगरे ,देवीदास घायतिडक, पंडीत माने , विनायक देशमुख, संजय डुरे - पाटील , श्रीशैल्य भालशंकर ,चंद्रकांत साळुंखे , नानासाहेब धायगुडे ,शिवाजी सुळे ,  संदिपान क्षिरसागर , काका गायकवाड , अहेमद शेख आदी मान्यवरासह शेकडो नागरिक उपस्थित होते.