होमपेज › Solapur › ‘ओखी’च्या वादळाचा करमाळ्याला फटका

‘ओखी’च्या वादळाचा करमाळ्याला फटका

Published On: Dec 08 2017 1:43AM | Last Updated: Dec 07 2017 8:56PM

बुकमार्क करा

करमाळा : अशपाक सय्यद

गेल्या दोन दिवसांपासून तामिळनाडूतून मुंबई-कोकण किनारपट्टीवर धडकलेल्या ओखी वादळाने करमाळा तालुक्यातील वातावरणातही बदल घडून आला असून निर्माण झालेल्या ढगाळ वातावरणाने व हलक्या पावसाने बळीराजा धास्तावून गेला आहे.

सोमवारी व मंगळवारी संध्याकाळी करमाळा शहरासह ग्रामीण भागात अनेक ठिकाणी रात्री व पहाटे अत्यंत हलकासा पाऊस झाल्याने बळीराजा धास्तावून गेला आहे. यावेळी वाळू घातलेली मका, उडीद आदी धान्य भिजण्याचा धोका निर्माण झाल्याने शेतकर्‍यांची मोठ्या प्रमाणात धावपळ झाली.

मंगळवारी व बुधवारी दिवसभर आभाळ आल्याने ऊन-सावलीचा खेळ शहर व तालुकावासीयाला पहायला मिळाला. सध्या मकासाठी जेऊर येथे, तर उडीदासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीत हमीभाव खरेदीकेंद्र सुरू करण्यात आले आहे. मात्र सध्याच्या बदललेल्या वातावरणामुळे हमीभावासाठी आणलेल्या धान्याची आर्द्रता वाढल्याने हमीभाव केंद्रातून हे धान्य नाकारले जात असल्याने शेतकरीवर्ग अडचणीत आला आहे.

ओखी वादळाने मुंबई-कोकणात अधिक नुकसान केले नसले तरी या वादळाचा कमी दाबाचा पट्टा तयार होऊन तो गुजरातच्या दिशेने सरकल्याचे वृत्त असले तरी या वादळाच्या दुष्परिणामाने करमाळा तालुक्यातील शेतकरीवर्ग मात्र पूर्ण चिंतेत बुडाला आहे. या वादळामुळे तराटुन आलेल्या रब्बी हंगामातील ज्वारी पिकावर रोग पडण्याची शक्यता निर्माण झाल्याने शेतकरीराजा धास्तावला आहे. गहू, तूर, हरभरा पिकावर आळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वाढली आहे.

ऐन थंडीतही ओखी वादळामुळे उष्णतेत वाढ झाली असून उकाडाही वाढला आहे. गेल्या आठवडाभरापासून वाढलेली बोचरी थंडी आता गायब झाली असून सध्या गेल्या दोन दिवसांपासून गरम वातावरण निर्माण झाल्याने बंद झालेले पंखे पुन्हा सुरू झाले आहेत. हा परिणाम अजून दोन-तीन दिवस जाणवण्याची शक्यता असून बळीराजाची मात्र त्यामुळे चिंतेत वाढ झाली आहे.

सध्यातरी या बदललेल्या ढगाळ व हलक्या पावसामुळे तालुक्यातील शेतकरी धास्तावला असून ज्वारी, गहू, तूर, हरभरा पिकांवर रोग पडतोय का? की अजून अवेळी पाऊस झाल्याने काय नुकसान होईल, अशा विवंचनेत बळीराजा असून मका, उडीद याची आर्द्रता कशी कमी करता येईल, जेणेकरून हमीभाव केंद्रात विक्रीयोग्य धान्य करता येईल, याचा विचार त्याला भेडसावत आहे.