Sat, Jul 20, 2019 23:23होमपेज › Solapur › विठ्ठल दर्शनासाठी आता महिलांची स्वतंत्र रांग नाही

विठ्ठल दर्शनासाठी आता महिलांची स्वतंत्र रांग नाही

Published On: Jul 06 2018 1:35AM | Last Updated: Jul 06 2018 12:53AM सोलापूर : प्रतिनिधी

पंढरपुरात आषाढी वारी  सोहळा 13 ते 27 जुलै या कालावधीत होणार आहे. आषाढी वारी सोहळ्यासाठी पंढरपूर येथे येणार्‍या वारकरी भाविकांची संख्या लक्षात घेता विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने दर्शनासाठी केलेल्या दर्शन बारीखेरीज  मंदिराभोवती असलेल्या कोणत्याही इमारतीच्या  दरवाजाने मंदिरात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आल्याचे आदेश अप्पर जिल्हादंडाधिकारी संजय तेली यांनी जारी केले आहेत.

पंढरपुरात आषाढी यात्रेनिमित्त लाखो भाविक वारकरी दर्शनासाठी येत असतात. यामुळे 13 ते 27 जुलै आषाढी वारी कालावधीत पंढरपुरात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी मुंबई पोलिस कायदा कलम 37 (4) अन्वये सदर आदेश लागू करण्यात आले आहेत. आदेशानुसार विठ्ठल- रुक्मिणी मंदिर सार्वजनिक पूजा व इतर धार्मिक विधीच्या वेळा सोडून भाविकांना दर्शनासाठी खुले राहणार आहे. मंदिर समितीने केलेल्या दर्शनबारीतूनच भाविकांना दर्शनासाठी सोडले जाईल. अन्य कोणत्याही दरवाज्यातून  सोडण्यात येणार नाही. दर्शनासाठी महिलांना वेगळी रांग नाही. तर उत्तर दरवाज्यातून व्हीआयपी गेटवरुन फक्त समिती निमंत्रित पाहुणे तसेच मंदिर समितीने परवानगी दिलेल्या निमंत्रित व्यक्तींनाच मंदिर समितीच्या प्रतिनिधीने खात्री करून दिल्यानंतरच मंदिरात प्रवेश दिला जाईल. भाविकांनी मुख दर्शनानंतर उत्तर दरवाज्यातूनच बाहेर पडावे. तसेच पश्‍चिम दरवाज्या समोरील मोकळ्या जागेत गर्दी होणार नाही, याचीही  दक्षता भाविकांनी घ्यावी. मंदिराच्या सोळखांबी जवळील उत्तरेकडील दरवाज्यानेही भाविकांना येण्या-जाण्यास मनाई करण्यात आली आहे. दर्शनबारीनुसार भाविकांना दर्शन मिळावे, यासाठी नियोजन करुन मंदिराच्या आतील सर्व दरवाजे बंद ठेवण्यात यावेत, हे दरवाजे आपत्कालीन प्रसंगी व प्रशासकीय कामाच्या आवश्यकतेनुसार उघडण्यात येतील. या आदेशात आवश्यकतेनुसार फेरबदल करण्याचे अधिकार राखून ठेवण्यात आल्याचेही अप्पर जिल्हादंडाधिकारी संजय तेली यांनी आदेशात नमूद केले आहे.