Mon, Jun 17, 2019 14:34होमपेज › Solapur › आता देवपूजाही महागली 

आता देवपूजाही महागली 

Published On: Sep 10 2018 1:18AM | Last Updated: Sep 09 2018 8:51PMसोलापूर : रामकृष्ण लांबतुरे  

प्रत्येक व्यक्ती आपल्या इष्ट देवताला प्रसन्न करण्यासाठी, सुख-समृद्धीसह श्रद्धेपोटी ‘देवपूजा’ करुन समाधान मिळवण्याचा प्रयत्न करतो. मात्र आता ही देवपूजा महागली आहे. 

चीन, मलेशिया येथून कापूरसाठी लागणार्‍या कच्चा मालाची पावडर निर्मितीवर बंदी घातल्याने तेथून माल मिळणे बंद झाले आहे. त्यात सरकारच्या जीएसटी धोरणात कापरावर 18 टक्के जीएसटी लावून भक्तांच्या  देवपूजेत आणखी महागाईचे विघ्न आले आहे. वस्तू व सेवा कर (जीएसटी) लागू झाल्यानंतर अनेक वस्तूंचे भाव वधारले असताना यातून पूजेचे साहित्यही सुटलेले नाही. जास्त वापर नसला तरी दररोज घरोघरी व मंदिरात सकाळ-संध्याकाळ देवापुढे ज्योत लावली जाते त्या कापूरचे भाव थेट दुपटीने वाढले आहेत. अगोदर मूळ किंमतीत वाढ जीएसटी लागू होण्यापूर्वीच कापूरच्या मूळ किंमतीत भाववाढ झाली.

कापूर ही प्रत्येकासाठीची क्षुल्लक बाब आहे. मात्र देवघरात आणलेली कापराची डब्बी लवकर संपली की झालेली दरवाढ लक्षात येत आहे. कारण  डबीची किंमत वाढवली  नसली तरी त्यातील कापरच्या वड्यात घट करण्यात आली आहे. दोन-अडीच महिन्यापूर्वीच जीएसटी आणि कच्चा माल बंद झाल्याने दरवाढ झाली आहे. मात्र श्रावणातील धार्मिक कार्यक्रमात कापराची मागणी वाढल्याने दरवाढीकडे लक्ष गेले. 

परराज्यातून मोठ्या प्रमाणात आवक सोलापूरच्या बाजारपेठेत मुंबई, नागपूर यासह चेन्नई, उज्जैन, अहमदाबाद येथून मोठ्या प्रमाणात कापूर येतो. येथून तो विविध तालुक्यांच्या ठिकाणी विक्रीसाठी पाठविला जात असतो. लागणारी पावडर ही पहिल्या 300 रुपये किलोने मिळत होती. आता त्यात वाढ होऊन 1100 रुपये किलो पावडर झाली आहे. शहरातील काही घाऊक व्यापार्‍यांकडून हा कापूर तालुक्यांच्या ठिकाणी विक्रीसाठी जात असतो.  18 टक्के थेट जीएसटी लागू होण्यापूर्वी कापूरवर कर नव्हता. मात्र 1 जुलैपासून त्यावर थेट 18 टक्के जीएसटी लावण्यात आला आहे. त्यामुळे आधीच 500 ते 550 रुपये किलोवर पोहचलेल्या कापूरचे भाव आता 600 ते 625 रुपये प्रति किलो झाले आहेत. एकूणच पूर्वीच्या भावामध्ये थेट दीडपट वाढ झाली आहे.  शहरात काही ठिकाणी कच्च्या पावडरमधून कापराच्या वड्या करुन मॅन्युफॅक्चरिंग करुन कापूर विकला जातो. आता या दरवाढ आणि जीएसटीमुळे पाच रुपयांची कापराची डब्बी पाच रुपयास विकतात. मात्र त्यातील पन्नास असलेले नग कमी करुन वीसवर आणले आहेत. शंभर ग्रॅमच्या कापराची डब्बी 50 रुपयांस मिळत होती, आता तीच डब्बी शंभरावर गेल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात येत आहे. थोडक्यात, आता येणार्‍या गणरायाची आरती करण्यातही महागाईचे विघ्न आले असून भक्तांच्या खिशाला चाट बसणार आहे.

 दरवाढ, जीएसटीतून मार्ग काढण्यासाठी भेसळीचा पर्याय 
झालेली दरवाढ, जीएसटी टाळण्यासाठी अनोखी शक्कल कापूरवर 18 टक्के जीएसटी लावण्यात आल्याने भेसळयुक्त कापूरची निर्मितीही होऊ लागली आहे. त्यामुळे त्याची कमी दरात विक्री होत असल्याचे व्यापार्‍यांचे म्हणणे आहे. जो अस्सल कापूर असतो, तो पूर्ण जळतो, मात्र भेसळयुक्त कापूर जळाल्यानंतर शेवटी राख शिल्लक राहते,  ही भेसळयुक्त कापूरची ओळख असल्याचे सांगितले जाते.