Thu, Jun 27, 2019 10:09होमपेज › Solapur › पंढरपूर पालिकेत हालचाल रजिस्टरला केराची टोपली

पंढरपूर पालिकेत हालचाल रजिस्टरला केराची टोपली

Published On: Apr 27 2018 12:44AM | Last Updated: Apr 27 2018 12:29AMपंढरपूर :  प्रतिनिधी

पंढरपूर नगरपालिकेतील दैनंदिन कामकाजाचा गाडा सध्या अधिकारी व कर्मचार्‍यांच्या मर्जीने चालत आहे. प्रशासनाने ठरवलेले नियम कागदावरच आहेत. अधिकारी, कर्मचारी बाहेर जाताना हालचाल रजिस्टरला नोंद करत नाहीत. अधिकारी व कर्मचार्‍यांना कारवाईची  कसलीही भीती उरलेली नाही असे दिसून येत आहे. पंढरपूर नगरपालिकेत घरपट्टी भरणा, जन्म-मृत्यूचे दाखले, नागरी सुविधांची मागणी व अन्य अत्यावश्यक सेवांसाठी नागरी सुविधा केंद्रामध्ये नागरिकांची सतत गर्दी असते. सकाळी साडेदहा ते एक या दोन तासांचा अपवाद वगळला तर पालिकेच्या बहुतांश विभागाचे कर्मचारी जागेवर आढळून येत नाहीत. त्यामुळे नागरिकांना नाहक मनस्ताप सोसावा लागत आहे. शहराच्या कोणत्या भागात त्यांची हजेरी असते याचा कोणालाच पत्ता नसतो. पालिकेत जे आस्थापनेवर आहेत त्या कर्मचार्‍यांना सकाळी दोन तासांचा अपवाद वगळला तर काही काम नसते का? असा प्रश्न निर्माण होत आहे.

लेखा विभागात आर्थिक विभागाची दैनंदिन उलाढाल असल्याने तेथील कर्मचार्‍यांना इतर गोष्टी करायला वेळच नसतो. मात्र आरोग्य, शहरविकास, नियोजन, जन्म-मृत्यू नोंदणी, बारनिशी, भांडार, वृक्ष, आस्थापना, विद्युत पाणी पुरवठा या महत्त्वपूर्ण विभागांमध्ये अनेक कामांसाठी दोन-चार हेलपाटे मारावे लागत असल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतो. पाणी पुरवठा  विभागाविषयी अशा तक्रारींचे प्रमाण जास्तच आहे.

पालिकेत दुपारी तीनच्या दरम्यान चक्कर मारल्यास प्रशासन अधिकारी सोलापूरला गेले आहेत. भाग निरीक्षक आपापल्या भागांमध्ये गेले आहेत. आरोग्य निरीक्षक आताच बाहेर पडले आहेत, विद्युत अभियंता नगराध्यक्षांकडे गेलेत. जन्म-मृत्यू विभागाचा लिपिक लेखा विभागात बिले देण्यासाठी गेला आहे, अशी उत्तरे नागरिकांना ऐकायला मिळत आहेत. नियमाप्रमाणे पालिकेच्या कर्मचार्‍यांची कामाची वेळ सकाळी साडेदहा ते सायंकाळी सहा अशी निर्धारित करण्यात आली आहे. मात्र ही वेळ कधीच पाळली जात नाही बहुतांश कर्मचारी अकरा वाजल्यानंतर पालिकेत उगवतात.

तेथून पुढे त्यांचे काम सुरू होते दुपारी एक ते तीन ही वेळ जेवणासाठी निश्‍चित करण्यात आली आहे. मात्र जेवणासाठी हमखास अडीच तासाची सुट्टी घेतली जाते. नागरी सुविधा केंद्रातील कर्मचारीही साडेतीन वाजेपर्यंत फिरकत नाहीत. काही कर्मचार्‍यांचा अपवाद वगळता दोन-तीन काउंटरवरील कर्मचारी गायब असतात. आणखी एक धक्‍कादायक बाब म्हणजे पालिकेतील हालचाल रजिस्टरच नसल्याचेे मुख्याधिकारी यांनी सांगितले. यामुळे पंढरपूर पालिका अधिकार्‍यांची हालचाल रजिस्टरला केराची टोपलीच दाखवली असल्याचे दिसून येत आहे.सकाळी साडेदहाच्या वेळी एकादा मस्टरला सही केली की अधिकारी वर्ग गायब. त्यामुळे नागरिकांना ताटकळत बसावे लागत आहे. पालिकेत कर्मचारी कामावर येतात, की कामावरून गायब होण्यासाठी येतात. असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. अधिकारी व कर्मचार्‍यांच्या या मनमानीला नगराध्यक्षा साधना भोसले यांनी चाप लावावा, अशी अपेक्षा नागरिकांमधून होत आहे.

Tags : Pandharpur, Palika Movement, Register Movement