Thu, Jul 18, 2019 02:31होमपेज › Solapur › पंढरपूर उपकारागृहात कैद्यांना विना पाण्याची शिक्षा

पंढरपूर उपकारागृहात कैद्यांना विना पाण्याची शिक्षा

Published On: May 19 2018 1:36AM | Last Updated: May 18 2018 8:01PMपंढरपूर : प्रतिनिधी

येथील उपकारागृहातील केैद्यांना पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली असल्याने उपकारागृहाच्यावतीने तात्पुरत्या पाण्याची सोय करण्यात येत आहे. मात्र पुरेशा प्रमाणात पाणी मिळत नसल्यामुळे ऐन उन्हाळ्यात कैद्यांना विना पाण्याची शिक्षा भोगावी लागत असल्याचा प्रकार उपकारागृह पंढरपूर येथे सुरू आहे.

तालुक्यातील विविध गुन्ह्यांत अटकेत असलेले आरोपी तहसील कार्यालयातील उपकारगृहात 60 हून जास्त आरोपी कैदेत आहेत. या आरोपींच्या सुरक्षिततेची जबाबदारी येथील जेलरवर आहे. त्यामुळे या ठिकाणी कैद्यांना जेवण देणे, पिण्याचे पाणी पुरवठा करणे याची जबाबदारी उपकारागृहाला करावी लागत आहे. सद्या उन्हाळ्याचे दिवस आहेत  त्यामुळे शिक्षा भोगत असलेल्या आरोपींना पिण्याच्या पाण्याची गरजेपेक्षा जास्त अवश्यकता भासत आहे.

त्याचबरोबर येथील शौचालयातही पाणी पुरवठा करावा लागत आहे. मात्र गेल्या दोन ते तीन दिवसांपासून नगरपालिकेच्यावतीने शहराला एकदिवसाआड पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत असल्याने सर्वसामान्य नागरिकांसह उपकारागृहातील आरोपींनाही पाण्यासाठी प्रतीक्षा करीत बसावे लागत आहे. एक तर येथे वीज गेली तर फॅन बंद राहत असल्याने आरोपींना डासांचा सामना करावा लागत आहे. असे असताना आता पिण्याच्या पाण्याचीही   टंचाई भेडसावत आहे. उपकारागृहात पिण्याच्या पाण्याचे साठवण करण्यासाठी सुविधा उपलब्ध नाही. केवळ तीन सिन्टेक्सच्या टाक्या ठेवण्यात आल्या आहे यातही पाणी नसल्याने नळपाणी पुरवठा करणार्‍या पाईपलाईनला गुरुवारी सायंकाळी मोटार बसवून पाणी टाकीत सोडण्यात येत हाते. असे करतानाही पाणी दाबाने येत नसल्याने पाण्याचा तुटवडाच जाणवत आहे. या प्रकाराची उपकारागृह प्रशासनाने गंभीर दखल घेऊन पाण्याची व्यवस्था करावी अशी मागणी  आरोपींच्या नातेवाईकांकडून होत आहे.

एक दिवसाआड पाणी पुरवठ्याचा परिणाम

नगरपालिकेच्यावतीने एकदिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येत असल्याने येथील उपकारागृहात एकदिवसाआडच पाणी मिळत आहे. यातही कमी दाबाने पाणी मिळत असल्याने नळपाणी पुरवठा पाईपलाईनला विद्युत मोटार लावून पाणी घ्यावे लागत आहे. पाणी  देण्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे नायब तहसिलदार तिटकारे यांनी   यांनी सांगीतले.