Thu, Sep 19, 2019 03:30होमपेज › Solapur › काम नाही तर वेतन नाही, शासनाचे परिपत्रक

काम नाही तर वेतन नाही, शासनाचे परिपत्रक

Published On: May 19 2019 10:50AM | Last Updated: May 19 2019 10:50AM
करकंब : भीमा व्यवहारे

आश्रमशाळेची मान्यता रद्द किंवा बंद झाल्यापासून ते नवीन आश्रमशाळेत रुजू  होईपर्यंतचा मधला कालावधी काम नाही तर वेतन नाही या धोरणामुळे विनावेतन आहे. तो सर्व कालावधी "ब्रेक इन सर्व्हिस" (सेवाखंड)  म्हणून समजावा आणि त्याबाबतची नोंद सेवा पुस्तकात घेण्यात यावी, याबाबतचे परिपत्रक शासनाने काढले आहे.

राज्यातील विजाभज इमाव व विमाप्र विभागाच्या ज्या आश्रमशाळा मान्यता रद्द झाल्यामुळे बंद होतात, त्या आश्रमशाळेतील शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी अतिरिक्त होतात. निविदा प्रकिया पूर्ण झाल्यानंतर जोपर्यंत त्या आश्रमशाळा इतर संस्थेद्वारा सुरु होत नाहीत, तोपर्यंत या शाळेतील अतिरिक्त शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचा-यांचे वेतन काम नाही तर वेतन नाही या धोरणाप्रमाणे सुरु राहत नाही. नवीन संस्थेकडे आश्रमशाळा हस्तांतरीत किंवा स्थलांतरीत झाल्यानंतर या अतिरिक्त कर्मचा-यांना त्या शाळेत रुजू  होण्यास सांगितले जाते. जे कर्मचारी आश्रमशाळेत रुजू होतात, त्यांची शाळा बंद असल्यापासून नवीन शाळेत रुजू होईपर्यंतचा यामधला जो कालावधी आहे, तो विनावेतन असल्यामुळे याबाबत काय आदेश काढावे, याबाबत सहायक आयुक्त व प्रादेशिक उपायुक्त यांनी या विभागाच्या आढावा बैठकीमध्ये विचारणा केली होती, तसेच त्याबाबत मार्गदर्शन देण्याची विनंती केली होती.

याबाबत शासनाने असे स्पष्ट केले की, आश्रमशाळा मान्यता रद्द किंवा बंद झाल्यापासून ते नवीन आश्रमशाळेत रुजू  होईपर्यंतचा मधला कालावधी काम नाही तर वेतन नाही या धोरणामुळे विनावेतन आहे, तो सर्व कालावधी "ब्रेक इन सर्व्हिस" (सेवाखंड) म्हणून समजावा आणि त्याबाबतची नोंद सेवा पुस्तकात घेण्यात यावी. असे परिपत्रक प्रधान सचिव जे पी गुप्ता यांनी काढल्याने आश्रमशाळा शिक्षकांचे धाबे दणाणले आहेत.