Fri, Jul 19, 2019 20:20होमपेज › Solapur › सोलापुरात एकही एसटी धावली नाही

सोलापुरात एकही एसटी धावली नाही

Published On: Aug 10 2018 12:59AM | Last Updated: Aug 09 2018 10:21PMसोलापूर : प्रतिनिधी

मराठा समाज   व मराठा क्रांती मोर्चा यांच्यावतीने गुरुवारी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. सोलापुरातदेखील कलेक्टर कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन व पुना नाका येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्र राज्य महामंडळ सोलापूर विभागाच्यावतीने एसटी बसेसच्या सुरक्षेच्या कारणास्तव सोलापुरात विभागातील 9 आगारांतून एकही बस न सोडण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आल्याचे एसटी प्रशासनाने सांगितले.

सोलापूर विभागात एकूण 9 आगार आहेत. यामध्ये दिवसभरातून एसटी गाड्यांच्या 3886 फेर्‍या केल्या जातात. या सर्व फेर्‍या मराठा आरक्षण बंदच्या पार्श्‍वभूमीवर रद्द करण्यात आल्या होत्या. सोलापूर विभागातील एसट्या दिवसभरातून एकूण 2 लाख 45 हजार किलोमीटरपर्यंत धावतात. यातून जवळपास 80 ते 90 लाख रुपयांपर्यंत सोलापूर विभागाला उत्पन्न मिळते. जवळपास 90 लाख रुपयांचे नुकसान  सोलापूर विभागाला झाले आहे.

परिवहन महामंडळाकडून पोलिसांच्या सुरक्षेविना एकही गाडी न सोडण्याचा आदेश देण्यात आला होता. तर पोलिसांनी महामंडळाला एकही गाडी बाहेर काढू नये असे बजावले होते. यामुळे सोलापूर विभातून एकही गाडी निघणार नसल्याचा आदेश   संबंधित आगारातील प्रमुखांनी एक दिवस अगोदर घोषित केले होते. संपामध्ये एसटी प्रशासनाच्या  गाड्यांना लक्ष्य केले जात होते. आषाढी वारीच्या काळात अचानक ठोक मोर्चे सुरु झाल्यामुळे  एसटी प्रशासनाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले  होते. हे नुकसान टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता.  

तालुका आगारप्रमाणे रद्द झालेल्या फेर्‍या  - सोलापूर आगार 168 फेर्‍या रद्द (20 हजार 631 कि.मी. प्रवास रद्द), पंढरपूर आगार 211 फेर्‍या रद्द (18 हजार 580 कि.मी. प्रवास रद्द), बार्शी आगार 200 कि.मी. (15 हजार 156 कि.मी. प्रवास रद्द), अक्कलकोट 111 फेर्‍या रद्द (9 हजार 614 कि.मी. प्रवास रद्द), करमाळा 171 फेर्‍या रद्द (8 हजार 341 कि.मी. प्रवास रद्द), अकलूज 139 फेर्‍या रद्द (10 हजार 803 कि.मी.चा प्रवास रद्द), सांगोला 116 फेर्‍या रद्द (8 हजार 319 कि.मी. प्रवास रद्द,  कुर्डुवाडी 97 फेर्‍या रद्द (8 हजार 471 कि.मी. प्रवास रद्द), मंगळवेढा 132 फेर्‍या रद्द (10 हजार 226 कि.मी. प्रवास रद्द).

जिल्हाभरात प्रवाशांची गैरसोय
सोलापूर विभागात 9 बसस्थानके येतात. सोलापूर स्थानकातून व तालुक्यातील इतर स्थानकांतून एकही बस न निघाल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली होती. सुरक्षेच्या कारणास्तव एकही बस न सोडण्याचा निर्णय  बंदच्या आदल्या दिवशीच घेण्यात आला होता. ग्रामीण भागातून शहराकडे  व शहरी भागातून ग्रामीण भागाकडे लालपरी धावलीच नाही.

बीएसएनएलची इंटरनेट सेवा सुरू
मराठा समाज आरक्षण आणि त्याबद्दल अनेक नानाविध मेसेज सोशल मीडियावर फिरत आहेत. त्याबाबत इंटरनेट सेवा बंद असल्याची चर्चा होती. त्यावर बाळे येथील बीएसएनएल कार्यालयातून माहिती घेतली असता बीएसएनएलची इंटरनेट सेवा सुरू असल्याचे सांगितले.