Mon, Mar 25, 2019 09:11होमपेज › Solapur › सोलापुरातील कारखान्यांचे धुराडे बंद पाडू : राजू शेट्टी

सोलापुरातील कारखान्यांचे धुराडे बंद पाडू : राजू शेट्टी

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

करकंब : प्रतिनिधी

सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी  पहिला हप्ता पुढच्या आठ दिवसांत न दिल्यास धुराडे बंद पाडू असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी दिला. एफआरपी अधिक ४०० रुपयांचा दर द्यावा, असे शेट्टी म्हणाले. उंबरे (पागे) येथे मंगळवारी सायंकाळी झालेल्या सभेत खासदार शेट्टी बोलत होते.  

खासदार शेट्टी म्हणाले, 'सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आता संघर्ष करण्याची वेळ आली आहे. अन्याय सहन करायचा नाही. साखर उतारा कमी दाखवून एक प्रकारे कारखानदार उताऱ्याची चोरी करीत आहेत. यापुढील काळात साखर कारखानदारांची संपत्ती जाहीर करावी.' तसे न झाल्यास आयकर विभागाच्या कार्यालयांवर मोर्चा काढू असा इशाराही खासदार शेट्टी यांनी दिला. या वेळी रविकांत तुपकर यांनी आक्रमक पवित्रा घेत योग्य दर मिळविण्यासाठी आंदोलनासाठी पुन्हा तयार राहण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले.

यावेळी जिल्हाध्यक्ष समाधान फाटे, नवनाथ माने, चंद्रकांत बागल, माजी उपसभापती विष्णु बागल, महामुद पटेल, विजय रणदिवे, तानाजी बागल, सचिन पाटील, विश्रांती भुसनर, अमर इंगळे, नितीन बागल आदीसह उंबरे, करोळे, कान्हापुरी, जळोली, सांगवी, पेहे, नांदोरे आदी भागातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.