Wed, Mar 20, 2019 08:33होमपेज › Solapur › निमगाव कॅनॉलवरील पुलाची दुरवस्था

निमगाव कॅनॉलवरील पुलाची दुरवस्था

Published On: Mar 06 2018 8:02PM | Last Updated: Mar 06 2018 7:11PMनिमगाव : वार्ताहर 

 निमगाव (ता. माळशिरस)  इरिगेशन टँक याहीवर्षी पावसाच्या पाण्याने पूर्ण क्षमतेने भरला आहे. या टँकपासून 9 किलोमीटर लांबीचा कॅनॉल आहे. या कॅनॉलवर गावाच्या पश्‍चिम भागाचे पिण्याचे पाणी व  शेतीचा पाणीपुरवठा अवलंबून आहे. मात्र या कॅनॉलचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याने पूल ‘असून अडचण नसून खोळंबा’ अशी अवस्था झाली आहे.  या कॅनॉलचे काम लघुपाटबंधारे विभागाच्यावतीने करण्यात आले असून  हे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे.  त्यामुळे कॅनॉलमध्ये मोठमोठे दगड, झाडेझुडुपे, ओढ्यावरील लोखंडी पुलाचे पिलर ढासाळलेले आहेत. दरवर्षी शेतकरी वर्गणीतून कॅनॉलची दुरूस्ती करण्यात येते.

याकरीता शेतकर्‍यांना आर्थिक भार सहन करावा लागत असतो. असे असतानाही अधिकार्‍यांच्या दुर्लक्षामुळे पुलांचे काम निकृष्ट झाले असल्याने शेतकर्‍यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.  
सध्या ओढ्यावरील लोखंडी ट्रप व पिलर कोसळल्याने दुरूस्तीसाठी मोठ्या प्रमाणात खर्च झाला आहे.  पाण्यापासून पाटबंधारे विभागाला पाणीपट्टी स्वरूपात दरवर्षी लाखो रुपये मिळतात. तरी पण हा विभाग कॅनॉल दुरुस्तीकडे दुर्लक्ष करीत आहे. कॅनॉलची देखरेख करणे टाळत आहे. त्यामुळे कॅनॉलचे संपूर्ण काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. गेल्या दहा ते बारा वर्षांपासून दुरूस्तीचे काम शेतकरी वर्गणीतून केले जाते.  दुरूस्तीकरीता पैसे, पाणीपट्टीचे पैसे यामुळे शेतकर्‍यांना आर्थिक भुर्दंड  सहन करावा लागत आहे.  लघुपाटबंधारे व इरिगेशन  विभागाने यावर त्वरित तोडगा काढावा व निकृष्ट कामाची चौकशी करुन दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी शेतकरीवर्गातून होत आहे.