Sun, May 26, 2019 14:45होमपेज › Solapur › सीईओ भारुडांपुढे विद्यार्थ्यांचा नववर्षाचा संकल्प!

सीईओ भारुडांपुढे विद्यार्थ्यांचा नववर्षाचा संकल्प!

Published On: Jan 10 2018 2:00AM | Last Updated: Jan 09 2018 10:15PM

बुकमार्क करा

सोलापूर : संतोष आचलारे

ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेतील हजारो विद्यार्थ्यांनी नववर्षानिमित्त अनेक चांगले संकल्प केले असून जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांना या विद्यार्थ्यांनी पोस्टकार्ड पाठवून आपल्या संकल्पना कळवून नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. जि.प. मुख्य कार्यकारी व थेट शाळेतील मुले यांच्यात थेट नाते निर्माण होत असल्याने हा विषय कौतुकास्पद ठरत आहे. 

डॉ. भारुड यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी या पदाची सूत्रे होती घेतल्यानंतर फेसबुकच्या माध्यमातून व ‘चिमणी पाखर’ं या उपक्रमातून जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला. यामुळे त्यांची गत काही महिन्यांपासून विद्यार्थ्यांशी चांगली मैत्री जमली आहे. मुलांना रुचेल, पचेल व समजेल या भाषेत डॉ. भारुड यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी चांगली प्रेरणा दिल्याने संवादातून मुलांत आत्मविश्‍वास बळावत असल्याचे दिसून येते.

जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांच्याकडे पाठविण्यात आलेल्या पत्रात अनेक विद्यार्थ्यांनी त्यांना भविष्यात त्यांच्यासारखा अधिकारी होण्याची इच्छा असून त्यासाठी कठोर परिश्रम करण्याची तयारी दर्शविली आहे. काही विद्यार्थ्यांनी सचिन तेंडुलकर यांच्यासारखे क्रिकेटपटू होण्याविषयी कळविले आहे. काही विद्यार्थ्यांनी डॉक्टर, शिक्षक, प्रोफेसर, वकील आदी होण्याची इच्छा प्रकट केली आहे. नववर्षानिमित्त आपल्या शाळेत, परिसरात व घरात स्वच्छता ठेवण्याचा, शौचालयाचा वापर करण्याचा व किमान एक तरी झाड लावून ते जगविण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचा संकल्प हजारो विद्यार्थ्यांनी डॉ. भारुड यांच्यासमोर पत्रातून व्यक्त केला आहे. काही विद्यार्थ्यांनी तर अत्यंत कल्पकतेने नववर्षाचे शुभेच्छापत्र तयार करून पाठविले आहे. त्यामुळे जिल्हा परिषद शाळेतील मुलांची कल्पकता व सजगता समोर आली आहे. 

सर्व शिक्षा अभियान, शाळा सिद्धी अभियान, प्रगत शैक्षणिक उपक्रमात राज्यात अव्वल ठरल्याने आतापर्यंत जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, शिक्षणाधिकारी यांचे कौतुक झाले आहे. मात्र कल्पकेतून व प्रत्येक घटना घडामोडीला अनुसरून ग्रामीण भागातील विद्यार्थी आपली गुणवत्ता पहिल्यांदाच धाडसाने दाखवून देत असल्याने जि.प. शाळा कात टाकत आहेत, यावर आता शिक्कामोर्तब होत आहे.