Wed, Jun 26, 2019 23:46होमपेज › Solapur › महाराष्ट्रात दंगलमुक्‍त सोलापूरचा नवा पॅटर्न

महाराष्ट्रात दंगलमुक्‍त सोलापूरचा नवा पॅटर्न

Published On: Jan 06 2018 1:28AM | Last Updated: Jan 05 2018 9:07PM

बुकमार्क करा
श्रीकांत साबळे

सोलापूर श्रमिकांचे, कष्टकर्‍यांचे शहर. मनगटातल्या बळावर श्रमाच्या आधारे जीवनाचा रहाटगाडा ओढणार्‍या श्रमिकांचे हे वस्तीस्थान. जसे श्रमिक तसेच सृजनशील संतांचे देखील हे निवासस्थान.  सिद्धेरामेश्‍वरांपासून स्वामी समर्थांपर्यंत, शुभराय महाराजांपासून बसवेश्‍वरांपर्यंत अनेक संतांच्या पदस्पर्शाने ही भूमी पुनित झाली. मध्ययुगीन काळापासून अनेक संतांच्या पालख्या, दिंड्या येथे येत राहिले.

धर्माचे सोहळे, महापुरुषांच्या जयंत्या, सण, उत्सव या शहराचा नित्यधर्म. उद्योगनगरी म्हणून अनेक शेजारील शहरातील, राज्यातील, गावोगावीचे श्रमिक येथे आश्रयाला येत राहिले. त्यांच्यासोबत त्यांचे धर्म, जात, संस्कृती देखील इथे आली. सांस्कृतिक, सामाजिक व धार्मिक बाहुल्य निर्माण झाले. श्रध्दा आणि अनेक श्रध्दास्थानं निर्माण झाली. शहरात संवदेनांची केंद्र वाढली तसे शहर संवेदनशील बनत गेले.  गिरण्या बंद पडल्या. बेकारी वाढली. उत्सवप्रियतेच्या नावाखाली संवेदनांचा बाजार मात्र गरम होत राहिला. त्यातूनच शहरात छोट्या मोठ्या घटनातून तणाव वाढू लागला.

अध्यात्मनगरी सवेंदनशीलतेचे, दंगलीचे आगार बनली. त्यामुळे दंगलयुक्‍त महाराष्ट्रात सोलापूर नेहमीच अग्रभागी राहिल्याचे दिसून येते. परंतु दंगलयुक्‍त सोलापूरची ओळख ही आता पुसली जाऊ लागली आहे. दंगली घडवून किंवा दंगलीत सहभागी होऊन कुणाचे काहीही साध्य होणार नाही, हे आम सोलापूरकरांना उमगले आणि समजले आहे. त्यामुळे की काय अलीकडच्या काळात महाराष्ट्र जेव्हा-जेव्हा पेटला, त्या-त्या वेळी याच सोलापूरकरांनी संयमाची भूमिका स्वीकारून आपल्या मनातील धगधगत्या यज्ञकुंडाला भीमेच्या पवित्र पाण्याचा जलाभिषेक करून त्याला शांत करण्याची भूमिका स्वीकारली.

अगदी काल-परवाचे उदाहरण घ्यावयाचे झाले, तर भीमा-कोरेगाव याठिकाणी उसळलेल्या दंगलीच्यानंतर अवघ्या महाराष्ट्रातील कधीकाळी शांत असलेली शहरेही दंगलीच्या झळा सोसत होती. परंतु सोलापुरातील आम जनता मात्र थंडीच्या लाटेतील गारव्याचा आनंद उपभोगत स्वप्नाच्या दुनियेत रंगली होती. सकाळी-सकाळी पेटणार्‍या शहरातील आम सोलापूरकर जाती-पातीचे बंधने तोडून शेकोट्यावर गुण्यागोविंदाने ‘आज तर थंडी आहे की रे’ म्हणून एकमेकांची खुशाली विचारताना दिसत होता. ही चित्रे पाहून बाहेरील जिल्ह्यात, राज्यात राहणारे सोलापूरकरही काहीकाळ चक्रावून असा बदल कसा आणि कधी घडला या उत्तराच्या शोधात अडकून पडले आहेत. खरंच सोलापूर एवढे आणि कशामुळे बदलले, असा प्रश्‍न अनेकांना सतावत आहे.

या प्रश्‍नाच्या उत्तराचा खोल जाऊन अभ्यास केला तर आम सोलापूरकरांना आता अशा प्रकारचे दंगे-फिंगे नको झाले आहेत. घराशेजारचा, नात्यातील, रक्‍ताच्या नात्यातील अशा अनेकांची कुटुंबे उध्दवस्त झाल्याचे याच सोलापूकरांनी उघड्या डोळ्यांनी पाहिले आहे. त्यामुळे दंगे आता नको रे बाबा, ही आम सोलापूरकरांची मानसिकता झाली आहे. त्यातच राजकीय पक्षांकडून केवळ सोयीसाठी या दंग्यांचा वापर केला जातो, हेही आता सोलापूरकरांना उमगले आहे. त्यामुळे दगड उचलायला कुणी तयार होताना दिसून येत नाही. याची दुसरीही बाजू महत्त्वाची आहे.

याठिकाणी कायद्याचे रक्षण करण्यासाठी सज्ज असलेली पोलिस यंत्रणा. गत काही वर्षातील पोलिस यंत्रणेचा कामाचा अभ्यास केला तर जाणवते की, पोलिसांनी विशेषत: वरिष्ठ अधिकार्‍यांनी काय देता ही भूमिका सोडून केवळ कायद्याचे राज्य या मूळ संकल्पनेवर भर देऊन कम्युनिटी पोलिसिंगवर अधिक भर दिल्याचे दिसून येते. तत्कालीन रविंद्र सेनगावकर असो देत किंवा विद्यमान पोलिस आयुक्‍त महादेव तांबडे यांनी आणि त्यांच्या टीमने भुरटेगिरी करून समाजात तेढ निर्माण करणार्‍यांचा वेळीच केलेला बंदोबस्त यामुळे आता मोठ्यातील मोठा नेतादेखील समाजात तेढ निर्माण करण्याची भाषा करण्यापूर्वी दहावेळा विचार करुनच पुढचा निर्णय घेत आहे.

त्यामुळे पोलिसांचा निर्माण झालेला दरारा आणि आम सोलापूकरांची बदललेली मानसिकता यामुळे सोलापूर आता दंगलमुक्‍त शहराच्या दिशेने वाटचाल करू लागले आहेत. सोलापूर शहराप्रमाणेच ग्रामीण भागातील कायदा-सुव्यवस्थेवर जनतेचा वाढत चाललेला विश्‍वास याचाही याठिकाणी आढावा घेणे क्रमप्राप्त आहे. विद्यमान पोलिस अधीक्षक वीरेश प्रभू यांनी अत्यंत चाणक्ष्यपणे ग्रामीण भागातील जनतेला न्याय देण्याची भूमिका स्वीकारलेली आहे. त्यामुळेच की काय, सोलापूर शहराप्रमाणे ग्रामीण भागातही किरकोळ अपवाद वगळता दंगे करण्याची कोणी हिम्मत करताना दिसून येत नाही. म्हणून एकीकडे महाराष्ट्र पेटलेला असताना सोलापूरकरांनी जो दंगामुक्‍त सोलापूरचा आदर्श समाजाला घालून दिलेला आहे, तो निश्‍चितच येणार्‍या पिढीसाठी आदर्शवत असाच आहे, असेच यानिमित्ताने वाटते.