Mon, Aug 19, 2019 17:30होमपेज › Solapur › शैक्षणिक दत्तक योजनेतून नवा आदर्श

शैक्षणिक दत्तक योजनेतून नवा आदर्श

Published On: Jun 25 2018 1:53AM | Last Updated: Jun 24 2018 9:23PMबार्शी ः गणेश गोडसे 

आजच्या धावत्या जगात सामाजिक संघटनांच्या समाजहिताच्या विचारसरणीतही मोठी भरीव वाढ होत असल्याचे व तो विचार कृतीतही आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न बार्शी शहरासह महाराष्ट्रात कार्य करत  असलेल्या काही संवेदनशील विचारांच्या संघटनांकडून होत असल्याचा प्रत्यय नुकताच  बेलगाव, ता. बार्शी येथे राजमाता प्रतिष्ठानच्यावतीने राबविण्यात आलेल्या शैक्षणिक उपक्रमामधून समोर आले आहे. 

आपण, आपले घर, आपला मुलगा अथवा मुलगी एवढ्यापुरताच संकुचित विचार ठेवणार्‍या  आजच्या समाजात  अशा काही संघटनाही आहेत की ज्या आपल्या घराबरोबरच आपला गाव, गावातील मुले शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी धडपडत  असतात.

राजमाता प्रतिष्ठानच्यावतीने बार्शी तालुक्यातील बेलगाव येथील  प्राथमिक शाळेतील 9 मुले दत्तक घेतली आहेत. नुकत्याच बेलगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रांगणात या दत्तक मुलांना शैक्षणिक साहित्यांचे वितरण करण्यात आले. दत्तक 9 मुलांचा सर्व वार्षिक खर्च संघटना उचलणार  आहे. या कार्यक्रमाला शाळा केंद्रप्रमुख, शाळा मुख्याध्यापक कांदे सर, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष तुळशीदास शेळके, विश्‍वास शेळके, आगतराव शेळके, संघटना खजिनदार तात्यासाहेब शेळके, औदुंबर साळुंके, सरपंच परसुराम कांबळे तसेच मुलांचे पालक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. 

गडकोट संवर्धन कार्याबरोबर इतर सामाजिक उपक्रम सातत्याने संघटना राबवत आली असल्याची माहिती राजमाता प्रतिष्ठानचे पुणे जिल्हा संपर्कप्रमुख राम जठार यांनी दिली.छत्रपती शिवरायांच्या विचारांचा वारसा जपून गडसंवर्धन करणे हे संघटनेचे मुख्य कार्य असून इतर सामाजिक अडचणींवेळी समाजाच्या मदतीला वारंवार संघटना धावून जात आल्याचे संघटनेचे अध्यक्ष संतोष रणपिसे  यांनी सांगितले. प्राथमिक शिक्षणापासून ग्रामीण भागातील मुले वंचित राहू नयेत म्हणून संघटनेच्यावतीने हा विद्यार्थी हिताचा उपक्रम राबवला असल्याचे राजमाता प्रतिष्ठानचे संस्थापक बापूसाहेब शेळके यांनी सांगितले.