Wed, Apr 24, 2019 15:29होमपेज › Solapur › विठ्ठल मंदिरासाठी आता 'मार्गदर्शक समिती'

विठ्ठल मंदिरासाठी आता 'मार्गदर्शक समिती'

Published On: Apr 06 2018 8:33AM | Last Updated: Apr 06 2018 8:33AMसोलापूर : श्रीकांत साबळे

वरिष्ठ वारकऱ्यांचे मार्गदर्शन सध्या अस्तित्वात असलेल्या विठ्ठल-रूक्मिणी मंदिर समितीस कायमस्वरुपी मिळावे, यादृष्टीने अशा वरिष्ठ वारकऱ्यांचा समावेश करण्यात येणार आहे. त्यासाठी अशा वारकर्‍यांच्या एका “मार्गदर्शक समिती”ची तरतूद नव्या अधिनियमात करण्यात आली आहे. तिची घोषणा लवकरच शासन स्तरावरून करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान, शासनाने गुरुवारी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या सहअध्यक्षपदी गहिनीनाथ ज्ञानेश्वर महाराज (औसेकर) यांची नियुक्ती केली असून रिक्त सहा जागांवरही नवीन नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे समिती सदस्यांची संख्या १२ वर पोहचली आहे.

पंढरपूरमधील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या कामकाजासाठी राज्य शासनाने स्वतंत्र कायदा तयार केला. या कायद्यानुसार अध्यक्षांसह एकूण १२ सदस्य अशी समिती स्थापन करण्यात आली होती. मात्र, या समितीमध्ये सर्वसामान्य जनतेचा सहभाग वाढावा, यासाठी राज्य शासनाने अध्यक्षांसह सदस्य संख्या एकूण १५ करण्याचा निर्णय घेतला होता. पूर्वीच्या नऊ जागांमधील रिक्त ३ जागा व सहअध्यक्षांसह नव्याने निर्मिती ३ जागांवर नव्या सदस्यांची नियुक्ती करण्याचा आदेश राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आला आहे.

या समितीच्या सह अध्यक्षपदावर गहिनीनाथ ज्ञानेश्वर महाराज (औसेकर) यांची तर उर्वरित सहा रिक्त जागांवर आमदार सुजितसिंह मानसिंह ठाकूर, हभप ज्ञानेश्वर नामदेव देशमुख (जळगावकर), ॲड. माधवी निगडे, प्रकाश जवंजाळ, भागवतभूषण अतुलशास्त्री भगरे गुरुजी आणि हभप शिवाजीराव मोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

नव्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे कामकाज पंढरपूर मंदिरे अधिनियमानुसार सुरू राहणार आहे. मंदिराचे उत्तम प्रशासन व नियमन होण्यासाठी तसेच भक्तांसाठी अधिक चांगल्या सोई- सुविधा पुरविणे, चैत्री, आषाढी, कार्तिकी आणि माघी यात्रा संबंधातील विविध धार्मिक विधी आणि समारंभ योग्यरित्या रुढी परंपरा आधारित होण्यासाठी हा कायदा तयार करण्यात आला आहे. याशिवाय वरिष्ठ वारकऱ्यांचे मार्गदर्शन समितीस कायमस्वरुपी मिळावे, यादृष्टीने अशा वरिष्ठ वारकऱ्यांचा समावेश असलेली एक “मार्गदर्शक समिती”ची तरतूद अधिनियमात करण्यात आली असून तिचेही लवकर गठन करण्यात येणार आहे. यामुळे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचा कारभार अधिक लोकाभिमुख तसेच विठ्ठल-रुक्मिणी देवतांच्या परंपरागत चालत असलेल्या रुढी परंपरेनुसार होण्यास मदत होणार असा विश्वास सूत्रांनी व्यक्त केला आहे.

महाराज मंडळींना खूश करण्याचा प्रयत्न

विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीची पहिल्यांदा घोषणा झाल्यानंतर वारकरी फडकरी यांनी शासनाला चांगलेच कोंडीत पकडले होते. त्यानंतर नमते घेत शासनाने नव्या सदस्यांमध्ये बहुतेक महाराज मंडळींना स्थान दिले आहे. आता यानंतर नेमल्या जाणाऱ्या मार्गदर्शक समितीतही महाराज मंडळींना सामावून घेतले जाणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे सरकारचा महाराज मंडळींना खूश करण्याचे नवे तंत्र या समितीच्या माध्यमातून गवसल्याची चर्चा आहे.

Tags : pandharpur, pandharpur news, vitthal temple, vitthal rukmini temple