Wed, Feb 26, 2020 02:23होमपेज › Solapur › नेहरु व सावित्रीबाई वसतिगृहांतील विद्यार्थ्यांची हजाराने भाडेवाढ होणार

नेहरु व सावित्रीबाई वसतिगृहांतील विद्यार्थ्यांची हजाराने भाडेवाढ होणार

Published On: May 05 2018 11:23PM | Last Updated: May 05 2018 10:34PM सोलापूर : प्रतिनिधी

जिल्हा परिषदेच्या नेहरु व सावित्रीबाई फुले वसतिगृहांतील मुलांच्या वार्षिक शुल्कात एक हजार रुपयांची वाढ करण्याचा निर्णय जि.प. शिक्षण समितीने घेतला असून तसा प्रस्ताव स्थायी समितीपुढे पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शुल्कवाढीचा फटका बसणार आहे.  जि.प. उपाध्यक्ष तथा शिक्षण समितीचे सभापती शिवानंद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी जिल्हा परिषदेत शिक्षण समितीची सभा घेण्यात आली. यावेळी हा निर्णय घेण्यात आला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना रास्त दरात शिक्षणाची सुविधा निर्माण करण्याचा प्रयत्न होणे आवश्यक असताना उलट विद्यार्थ्यांच्या शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

नेहरु वसतिगृहातील काही गाळेधारकांनी भाडे थकीत ठेवले आहे. त्यांच्याकडून वसुली करण्यात आली नाही. शिवाय बाजारभावाने या गाळ्यांना भाडेवाढ होत नसल्याचे दिसून येते. त्यामुळे जि.प. पदाधिकार्‍यांच्या कारभारावर टिका होत आहे. यंदाच्या नव्या शैक्षणिक वर्षापासून मुलांच्या पाठीवरील दप्‍तराचे ओझे कमी करण्यासाठी विविध उपाययोजना करण्याचा निर्णय घेण्यात आला. शाळेच्या पहिल्या दिवशी पाठ्यपुस्तके व गणवेश वितरित करण्याचे नियोजन यावेळी करण्यात आले.

स्ट्रक्‍चरल ऑडिटनुसार 497 शाळा खोल्या धोकादायक आढळून आल्या आहेत. या शाळा खोल्यांच्या बांधकामासाठी व नवीन 240 शाळा खोल्यांच्या बांधकामासाठी सर्व शिक्षा अभियानातून शासनाकडे निधी मागण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. मंगळवेढा तालुक्यातील डोेंगरगाव जि.प. शाळेतील माजी विद्यार्थी विक्रांत मोरे यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळविल्याने त्यांच्या अभिनंदनाचा ठराव यावेळी घेण्यात आला. मागील वर्षातील जि.प. सेसफंडातील एलसीडी प्रोजेक्टरसाठी तरतूद असलेला; मात्र अखर्चित असलेला 1 कोटीचा निधी पुन्हा नवीन वर्षात वापरण्यासाठी मंजुरी देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.  या समितीच्या बैठकीस समितीचे सदस्य सवितादेवी राजेभोसले, मायक्‍का यमगर, रणजितसिंह शिंदे, उषा सुरवसे, स्वाती कांबळे आदी उपस्थित होते.