Sat, Jul 20, 2019 23:39होमपेज › Solapur › निष्क्रिय सरकार घालविण्यासाठी एकजूट हवी : खा. अशोक चव्हाण

निष्क्रिय सरकार घालविण्यासाठी एकजूट हवी : खा. अशोक चव्हाण

Published On: Mar 06 2018 12:09AM | Last Updated: Mar 05 2018 9:31PMतुळजापूर : प्रतिनिधी

सध्याचे निष्क्रिय व जुमलेबाज सरकार घालविण्यासाठी सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकदिलाने एकत्र यावे आणि आगामी लोकसभा, विधानसभा काँग्रेस पक्ष कार्यकर्त्यांनी सक्षमपणे सामोरे जावे. येणार्‍या काळात सुनियोजित संघटन उभे करून सध्याच्या सरकारचा नाकर्तेपणा समोर आणून पक्षाला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी सर्व पक्ष कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहन माजी मुख्यमंत्री तथा प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केले. ते तुळजापूर येथे सोमवारी (दि.5) आयोजित केलेल्या काँग्रेस कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरात बोलत होते. 

हे सरकार घोषणाबाज सरकार असून कसल्याही प्रकारचे ठोस निर्णय घेतलेले नाहीत. शेतकर्‍यांचे प्रश्‍न, कर्जमाफी, मराठा, धनगर, मुस्लिम आरक्षण, शेतकरी आत्महत्या यासारख्या अनेक मुद्द्यांची, प्रश्‍नांची सोडवणूक करण्यात भाजप सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. केवळ पोकळ घोषणा केल्या जात असून प्रत्यक्ष काम होत नाही, अशी टीका करत सरकारचा नाकर्तेपणा जनतेसमोर आणून येणार्‍या निवडणुकांमध्ये संपूर्ण परिवर्तन घडविण्यासाठी सज्ज व्हा, असे आवाहन केले. यावेळी व्यासपीठावर माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील-चाकूरकर, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माणिकराव ठाकरे, तुकाराम रेंगे-पाटील, उल्हास पवार, आ. मधुकरराव चव्हाण, आ. बसवराज पाटील, जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब पाटील आदींची उपस्थिती होती.

यावेळी जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब पाटील यांनी कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराची भूमिका विषद करताना व्हिजन-2019 हे उद्दिष्ट्य समोर ठेवून येणार्‍या निवडणुकांसाठी सुयोग्य धोरण, सोशल मीडियाचा प्रभावी वापर, सध्याच्या निष्क्रिय सरकारचे दोष, त्रुटी जनतेपुढे घेऊन जाणे यासह मजबूत पक्ष संघटन उभे करणे यासाठी हे शिबिर आयोजित केले असल्याचे सांगितले.या प्रशिक्षणातून अभ्यासू कार्यकर्ता तयार होऊन पक्ष संघटन निश्‍चितपणे बळकट होईल, असे प्रतिपादन केले. यावेळी हर्षवर्धन पाटील, शिवराज पाटील-चाकूरकर, उल्हास पवार आदींची समयोचित मार्गदर्शनपर भाषणे झाली. येणार्‍या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर पक्ष कार्यकर्त्यांना सोशल मीडियाचा प्रभावी वापर करून पक्षाची ध्येयधोरणे जनतेपर्यंत सक्षमपणे पोहोचवण्यासाठी हे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते. 

या प्रशिक्षण शिबिरात माजी जिल्हा परिषद अध्यक्ष धीरज पाटील, बापूराव पाटील, डॉ. स्मिता शहापूरकर, विश्‍वास शिंदे, राजलक्ष्मी गायकवाड, अशोकराव मगर, बाबुराव चव्हाण, सुनील चव्हाण, भारत कदम, सुनील रोचकरी, विलास शाळू, प्रशांत चेडे, संतोष बोबडे, सुभाषसिंह सद्दीवाल, संजय दुधगावकर, प्रकाश अष्टे, सज्जनराव साळुंके आदींसह जिल्ह्याभरातील काँग्रेस पक्ष कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमस्थळी दाखल होण्यापूर्वी काँग्रेसचे वरिष्ठ नेते प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण, माणिकराव ठाकरे, उल्हास पवार, हर्षवर्धन पाटील आदी नेत्यांनी तुळजाभवानी मंदिरात जाऊन तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतले. यावेळी आ. मधुकरराव चव्हाण, आ. बसवराज पाटील, जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब पाटील आदींची उपस्थिती होती.