Tue, Nov 13, 2018 21:22



होमपेज › Solapur › तुळजापुरातून मराठवाड्यात हल्लाबोल आंदोलनाची सुरुवात

तुळजापुरातून मराठवाड्यात हल्लाबोल आंदोलनाची सुरुवात

Published On: Jan 05 2018 1:29AM | Last Updated: Jan 04 2018 9:48PM

बुकमार्क करा




तुळजापूर : प्रतिनिधी

मराठवाड्यातून हल्लाबोल आंदोलन तुळजापूर शहरातून प्रारंभ करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस नेते आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली. ते तुळजापूर येथे नगरपरिषद हॉलमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. 17 जानेवारीपासून याचा प्रारंभ तुळजापुरातून होणार असून सरकारच्या फसव्या घोषणा आणि न झालेल्या विकासाबाबत जनतेस अवगत करून सनदशीर मार्गाने हे हल्लाबोल आंदोलन होणार आहे.

राज्य सरकार प्रत्येक बाबतीत सपशेल अपयशी ठरलेले आहे. शेतकरी अडचणीत असून बेरोजगारी वाढली आहे, महागाई दिवसेंदिवस वाढत चालली आहे. राज्य सरकारचे कुठल्याच क्षेत्रामध्ये चांगले किंवा भरीवकाम दिसत नाही. कर्जमाफीसह इतर अनेक घोषणा सरकारने केल्या, परंतु त्यातून शेतकर्‍यांना कसलाही दिलासा न मिळाल्याने शेतकरी आत्महत्याच्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे समाजात या सरकारविरोधात प्रक्षोभ दिसून येत आहे. राज्यसरकारचा प्रशासनावर योग्य पद्धतीने वचक नाही, त्यामुळे सामान्य नागरिक, शेतकरी यांची अनेक कामे मार्गी न लागता प्रलंबित राहत आहेत.

यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने हे आंदोलन हाती घेतले आहे. हे हल्लाबोल आंदोलन येत्या 17 जानेवारीपासून आई श्री तुळजाभवानीचे दर्शन घेऊन तुळजापुरातून सुरुवात करणार असल्याचे आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.  तुळजापूर शहर रेल्वेच्या नकाशावर आणण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू असे सांगत तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय शासनाकडे वर्ग करण्याबाबत प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन यावेळी आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी केले.

यावेळी उपनगराध्यक्ष पंडितराव जगदाळे, नगरसेवक अविनाश गंगणे, आनंद कंदले, संदीप गंगणे, अमर चोपदार, अभिजित कदम, विजय क्षीरसागर, विजय गंगणे, आप्पा पवार, शहाजी जाधव, सूरज जगदाळे आदी उपस्थित होते.