Thu, Apr 25, 2019 23:27होमपेज › Solapur › मंगळवेढा राष्ट्रवादीत मोठी चुरस

मंगळवेढा राष्ट्रवादीत मोठी चुरस

Published On: Mar 05 2018 8:11PM | Last Updated: Mar 05 2018 8:11PMमंगळवेढा : प्रा सचिन इंगळे

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्ह्यातील पदाधिकारी निवडी बाबत तालुकानिहाय बैठका घेण्याचा कार्यक्रम वरिष्ठ पातळीवरून सुरू झाला असून त्यात मंगळवेढा तालुक्याची बैठक नुकतीच पार पडली. यावेळी खा. शरद पवार यांना माणानरा मोठा वर्ग या बैठकीत उपस्थित होता. मात्र यात गटबाजी पुन्हा एकदा पहायला मिळाली.

सध्या राष्ट्रवादी काँग्रेस आगामी निवडणुकीच्यादृष्टीने पक्ष बांधणी आणि एप्रिलमध्ये होणार्‍या हल्लाबोल आंदोलनाबाबत पक्ष निरीक्षक संदीप वरपे सध्या जिल्हा दौर्‍यावर आहेत. मंगळवेढा तालुक्यात राष्ट्रवादीवर प्रेम करणारा वर्ग जास्त आहे मात्र पक्ष, पद, आणि निष्ठा याचा ताळमेळ नसल्याने अनेक जण सध्या फक्‍त बघ्याच्या भूमिकेत आहेत. तालुक्यातील अध्यक्ष आणि शहराध्यक्ष निवडी बाबत गेल्या चार महिन्यापासून सुंदोपसुंदी सुरू आहे . तालुक्यात दादागट, साहेबगट असे दोन विचार आहेत. त्यात छुपी स्पर्धा सुरू आहे दादा गटात फक्‍त दादा याना माणनारा अध्यक्ष झाला पाहिजे हा निकष पाहिला जात असल्याने निष्ठावंत नाराज आहेत. तर काहींना पक्ष उभारी मिळाली पाहिजे असे वाटते.  शहरात राष्ट्रवादीचे काम रतनचंद शहर सहकारी बँकेचे अध्यक्ष राहुल शहा यांच्या मार्गदर्शनाखाली चांगल्या प्रकारे सुरू आहे. नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादीचा नगराध्यक्ष आहे.

विकास कामे जोरात सुरु आहेत. राहुल शहा शहरात गटबाजी न होऊ देता शहराचे राजकारण चांगले करीत आहेत. शहराध्यक्षपदासाठी विद्यमान अध्यक्ष सोमनाथ माळी परत एकदा इच्छुक आहेत तर पक्ष नेते अजित जगताप देखील इच्छुक आहेत. हे दोघेही शहा यांचे समर्थक आहेत सोमनाथ माळी अध्यक्ष म्हणून काम करत असताना अनेक कसरती वरून जाताना दिसले.  तर जिल्हा नियोजन समितीवर काम करीत अजित जगताप यांनी शहर विकासास मोठा निधी आणला  आहे. त्यांच्याकडे संघटन कौशल्य चांगले असून काम करण्याची त्यांची पद्धत सकारात्मक आहे. सगळ्यांना सामावून घेत ते यशस्वी ठरतात. अशा कार्यकर्त्याची पक्षसंघटनेसाठी जास्त गरज आहे  असेही बोलले जात आहे. 

पक्षाचे तालुकाध्यक्ष म्हणून काशिनाथ पाटील हे काम करीत असले तरी  त्यांना अपेक्षेनुसार  आपले काम दाखवता आले नाही. त्यामुळे आता नव्याने अध्यक्ष निवडीत त्यांनी प्रा. पी. बी. पाटील यांना पाठिंबा दिला आहे. तर राष्ट्रवादीचे कट्टर समर्थक सुनील डोके हे अनेक दिवसापासून तालुकाध्यक्ष म्हणून काम करण्यास इच्छुक आहेत. त्यांनी पक्षाने त्यांच्याकड़े दिलेली जबाबदारी चांगल्या पद्धतीने पार पाडली आहे. ते अभ्यासू  तर आहेतच परंतु त्यांच्याकडे चांगले वक्तृत्व असून पेशाने शिक्षक आहेत . शिवाय संघटन कौशल्यात ते पुढे आहेत त्यांनाही संधी दिली जाईल असे बोलले जाते. यापूर्वी  पी.पी. पाटील यांनी तालुकाध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे.  सध्या ते प्रांतिक सदस्य म्हणून काम  करीत आहेत. असे असताना परत त्यांना तालुकाध्यक्ष केले जाईल का अशी शंका उपस्थित होत आहे.