Wed, Apr 24, 2019 12:26होमपेज › Solapur › राष्ट्रवादीच्या हल्लाबोल यात्रेत पंढरपूर का नाही?

राष्ट्रवादीच्या हल्लाबोल यात्रेत पंढरपूर का नाही?

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पंढरपूर : प्रतिनिधी

राष्ट्रवादीचे बहुप्रतिक्षित हल्लाबोल आंदोलन एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सोलापूर जिल्ह्यात येत असून या आंदोलनातून पंढरपूर वगळण्यात आले आहे. आंदोलनासाठी आलेल्या सर्व नेत्यांचा  मुक्काम अकलूजला नियोजित करण्यात  आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने  राज्यभरात सरकारविरोधात हल्लाबोल आंदोलन सुरू  आहे. मराठवाडा, विदर्भ, खानदेशात आंदोलन झाल्यानंतर   आता पश्‍चिम महाराष्ट्रात हे आंदोलन दाखल होत असून  राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यस्तरीय  नेते या आंदोलनात सहभागी होत आहेत आणि प्रत्येक विभागातील  समारोपाच्या अखेरच्या सभेला पक्षाध्यक्ष खा.  शरद पवार उपस्थित राहत आहेत. 

येत्या 6 आणि 7 एप्रिल  रोजी हे आंदोलन सोलापूर जिल्ह्यात येत आहे. यासंदर्भात जिल्ह्याभरात  जनजागृती मोहीम सुरू आहे. सोलापूर  जिल्ह्यात महुद, मोहोळ, टेंभुर्णी, बार्शी  या चारठिकाणी जाहीर  सभा होणार आहेत. या सभांचे नियोजन करण्यात आले असून सांगोला तालुक्यातील  महुद येथे, मोहोळ, बार्शी आणि माढा तालुक्यात टेंभुर्णी येथे या सभांचे आयोजन करण्यात आलेले आहे. विशेष  म्हणजे या मोठ्या आंदोलनातून सोलापूर आणि पंढरपूर वगळण्यात आल्याचे दिसत आहे. ज्या तालुक्यात आमदार आहेत त्या तालुक्यातच आंदोलन निश्‍चित करण्यात आल्याचे सांगितले जाते.   राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दीपकआबा साळुंखे-पाटील हे सांगोला तालुक्यातील असल्यामुळे महुद येथे सभा ठेवल्याचेही समजते. राष्ट्रवादीचे आमदार असलेल्या मोहोळ, माढा आणि बार्शी या तालुक्यांत या  बाकीच्या सभांचे आयोजन आहे. माळशिरस तालुक्यातही राष्ट्रवादीचा आमदार असला तरीही त्या तालुक्यात  हल्लाबोल आंदोलन होणार नाही. 

6 एप्रिल रोजी राष्ट्रवादीचे प्रदेश पातळीवरील नेते  अकलूज मुक्कामी असणार आहेत. यामध्ये खा. सुप्रिया सुळे, आ. अजित पवार, विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आदींसह प्रमुख नेतेमंडळींचा मुक्‍काम  अकलूजला निश्‍चित करण्यात आला आहे. आंदोलनास येणार खर्च कुणी करायचा या कारणावरूनही पंढरपूर या आंदोलनातून वगळण्यात आले असावे, अशी चर्चा सुरू आहे. त्याचबरोबर  हल्लाबोलसाठी येणार्‍या नेत्यांचा अकलूजला मुक्काम होणार असून अकलूज मुक्‍कामी आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची रणनीती ठरवण्यात येऊन जिल्ह्यातील पुढील राजकीय दिशाही  निश्‍चित केली जाईल, अशी चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे पक्षाचे जिल्हाध्यक्ष दीपकआबा साळुंखे हे सर्व नेत्यांचा मुक्‍काम सोनके येथील त्यांच्या फार्म हाऊसवर असावा याकरिता  प्रयत्नशील होते; मात्र वरिष्ठांनी अकलूजला प्राधान्य दिल्याचे दिसून येते.  

पंढरपूरला का वगळले ?

पंढरपूर हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. सध्या या तालुक्यात राष्ट्रवादीचा आमदार नसला तरीही राष्ट्रवादीला मानणारा खूप मोठा वर्ग या तालुक्यात आहे. गेल्या सहा महिन्यांत पंढरपूर  तालुक्यात राष्ट्रवादीची संघटनात्मक बांधणीही चांगल्या पद्धतीने होत आहे. असे असताना आपल्याच बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीने हल्लाबोल आंदोलन का घेतले नाही, असा सवाल  कार्यकर्त्यांतून  उपस्थित केला जात आहे. फेबु्रवारी महिन्यात तालुक्यात राष्ट्रवादीचा शेतकरी मेळावा घेण्यात येणार होता. त्याची तारीखही जाहीर करण्यात येत असतानाच तो मेळावाही पक्षाकडून रद्द करण्यात आला  होता, हे याठिकाणी विशेष उल्लेखनीय आहे. 

Tags : National Congress Party, Hallabol March, Maharashtra, Pandharpur, Politics, Sharad Pawar, Dhananjay MUnde, Supriya Sule, 


  •