Fri, Jul 19, 2019 05:37होमपेज › Solapur › नाथपंथी डवरी समाजाला एस.सी., एस. टी.च्या सवलती द्या : आठवले

नाथपंथी डवरी समाजाला एस.सी., एस. टी.च्या सवलती द्या : आठवले

Published On: Jul 09 2018 1:08AM | Last Updated: Jul 08 2018 8:32PMमंगळवेढा तालुका प्रतिनिधी

नाथपंथी डवरी-गोसावी समाजाला 10 टक्के आरक्षण देऊन एस.सी., एस.टीच्या सवलती मिळाल्या पाहिजेत त्या शिवाय यांना स्थैर्य मिळणार नाही  असे विधान केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री ना. रामदास आठवले यांनी केले. ते शनिवार  दि. 7 जुलै रोजी रात्री खवे-मानेवाडी येथे   धुळे हत्याकांडातील पिडीतांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी आले असता बोलत होते. यावेळी राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुखांनीही पीडितांची भेट घेतली. 

यावेळी ना. आठवले पुढे म्हणाले,  राजकीय क्षेत्रातही यांना आरक्षण मिळाले पाहिजे. या समाजाचे लोक मुलाबाळांना घेऊन पोटासाठी वनवण करतात. त्यांच्या समाजाच्या उन्नतीसाठी विशेष पॅकेज मिळावे. घटनेला सर्वस्वी सोशल मीडिया जबाबदार असून अफवा वाढत आहेत. यातील दोषी लोकांना फाशी झाली पाहिजे, या पीडित कुटुंबियांच्या पाठीशी सरकार निश्‍चितपणे असून त्यांचे पुनर्वसन, घरकुल, जमीन, ओळखपत्र  मिळाले पाहिजे. यावेळी ना.आठवले यांनी मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 50 हजारांचा धनादेश पक्षाच्यावतीने दिला. 

यावेळी सहकारमंत्री ना.सुभाष देशमुख म्हणाले, या समाजाच्या मदतीसाठी मी निश्‍चित मदत करेन. मी स्वतः याबाबत मुख्यमंत्र्यांशी बोलेन. या घटनेतील आरोपींना फाशी झाली पाहिजे. यासाठी चांगले वकील देण्याचा प्रयत्न केला जाईल. ना.देशमुख यांनी, सोलापूर सोशल फौंडेशनच्यावतीने प्रत्येक कुटुंबासाठी 25 हजारांची मदत दिली.  यावेळी आरपीआयचे प्रदेश सरचिटणीस राजाभाऊ सरवदे, प्रदेश संघटक सुनील सर्वगोड, युवा आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष अ‍ॅड.किर्तीपाल सर्वगोड, आरपीआय जिल्हाध्यक्ष अशोक सरवदे, जिल्हा सरचिटणीस जितेंद्र बनसोडे, विठ्ठल कारखान्याचे संचालक भगिरथ भालके, अ‍ॅड.सुजित कदम, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष शशिकांत चव्हाण,, शहराध्यक्ष गौरीशंकर बुरकूल आदी उपस्थित होते.