Fri, Apr 26, 2019 01:22होमपेज › Solapur › नंदीध्वजांचा करमुटगी सोहळा भक्‍तिभावात

नंदीध्वजांचा करमुटगी सोहळा भक्‍तिभावात

Published On: Jan 15 2018 1:45AM | Last Updated: Jan 15 2018 1:45AM

बुकमार्क करा
सोलापूर : प्रतिनिधी

शिवयोगी श्री सिद्धेश्‍वर महाराजांच्या योगदंड व मानाच्या काठ्यांना करमुटगी लावून स्नान घालण्यात आले. हिरेहब्बू व देशमुख यांच्या हस्ते करमुटगी विधी सोहळा  रविवारी सकाळी झाला. या विधी सोहळ्याला पालकमंत्री विजयकुमार देशमुख, राजशेखर हिरेहब्बू, मनोज हिरेहब्बू, जगदीश हिरेहब्बू, विनोद हिरेहब्बू, विकास हिरेहब्बू, राजशेखर देशमुख, सुदेश देशमुख, सुधीर देशमुख यांच्या उपस्थितीमध्ये हा धार्मिक विधी झाला. 

शनिवारी कुंभार कन्येचा विवाह सोहळा लाखोंच्या उपस्थितीमध्ये पार पडला. अक्षता सोहळा कार्यक्रम लाखोंच्या उपस्थितीमध्ये पार पडला. सुगडी पूजन, गंगा पूजनानंतर समंती वाचन झाले. ‘सत्यम्.. सत्यम्.. दिड्डम्..दिड्डम्.. बोला.. बोला.. एकदा भक्‍तलिंग हर्रऽऽ बोला हर्रऽऽ श्री सिद्धेश्‍वर महाराज की जय’च्या जयघोषात अक्षता सोहळा मोठ्या उत्साहात आणि आनंदात पार पडला. यावेळी राज्यातील, परराज्यातील लाखो भक्‍तगण अक्षता सोहळ्यात सहभागी झाले होते. 

अक्षता सोहळ्यानंतर रविवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास मिरवणुकीने मानाच्या सातही काठ्या संमती कट्ट्याजवळ आल्या. तेथे आल्यावर प्रथमत: सिद्धरामेश्‍वरांच्या योगदंडास करमुटगी लावून त्या योगदंडाची पूजा करण्यात आली.त्यानंतर 1 ते 7 नंदीध्वजांना करमुटगी लावून तलावात स्नान घालण्यात आले. सर्वांच्या उपस्थितीमध्ये मानाच्या काठ्यांची आरती करण्यात आली. योगदंड व काठ्यांना करमुटगी लावून स्नान घातल्यानंतर हिरेहब्बू व देशमुख यांच्या हस्ते सिद्धेश्‍वर मंदिरातील प्रथम अमृतलिंगाजवळ गंगापूजनाचा कार्यक्रम झाला.देशमुख परिवारातील महिला मोठ्या संख्येने या सोहळ्याला उपस्थित होत्या. देशमुख परिवारातील सदस्यांना हिरेहब्बूंनी विडा दिला. सौभ्याग्य लेणं घेऊन योगीराज कंटीकर यांनी गंगेस अर्पण केले. गर्भ मंदिरातील श्री सिद्धरामेश्‍वरांच्या पादुकास करमुटगी लावून पादूका धुण्यात आल्या. हिरेहब्बू यांनी गदगीची (मूर्तीची)पूजा केली. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास नंदीध्वज हिरेहब्बू वाड्यात परतले.

सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास हिरेहब्बू व देशमुख यांच्या हस्ते पूजा होत नंदीध्वज जुनी फौजदार चावडीजवळ आले व पहिल्या नंदीध्वजास नागफणी बांधण्यात आली. सोमनाथ मेंगाणे हे होमहवनाच्या दिवशी प्रथम नंदीध्वजाचे मानकरी आहेत. दिवसभर उपास ठेवून जुनी फौजदार चावडी ते होम मैदान इथपर्यंत नागफणी बांधलेले प्रथम नंदीध्वज सोमनाथ मेंगाणे हे एकटेच पकडतात. 2 ते 7 नंदीध्वजास बाशिंग बांधण्यात आले. नंदीध्वज होममैदानावर आल्यावर हिरेहब्बू होेमकुंडात उतरले. त्या होमकुंडात बाजरीच्या पेंडीने तयार केलेल्या कुंभार कन्येस शालू नेसून सौभाग्य अलंकार घालून कुंभारकन्येस मणी, मंगळसूत्र, बांगड्या, जोडवे, हार दांडा घालून कुंभारकन्येस सजवले. त्यानंतर हिरेहब्बू यांनी अग्नी दिली.  

या करमुटगी व होमहवन सोहळ्याची लगबग सकाळी आठ वाजल्यापासूनच सुरू झाली होती. रात्री उशीरापर्यंत होमहवनाचा विधी पार पडला. नंदीध्वजाचे मानकरी राजशेखर हिरेहब्बू यांच्या वाड्यातून हिरेहब्बू आणि देशमुख यांच्या हस्ते पूजा होऊन नंदीध्वजांच्या मिरवणुकीची सुरुवात झाली. श्री सिद्धरामेश्‍वरांच्या  या सोहळ्यासाठी आबालवृध्दांनी मंदिर परिसरात मोठी गर्दी केली होती. त्यामुळे मंदिर परिसरातील रस्ते भाविकांनी फुलून गेले होते. यावेळी संमती कट्ट्यावर या सोहळ्यासाठी मोठी गर्दी जमली होती.