Sat, Mar 23, 2019 02:20होमपेज › Solapur › नळदुर्ग किल्ल्यात सोयी-सुविधा देण्याची मागणी

नळदुर्ग किल्ल्यात सोयी-सुविधा देण्याची मागणी

Published On: Apr 29 2018 10:09PM | Last Updated: Apr 29 2018 9:02PMनळदुर्ग : प्रतिनिधी

नळदुर्ग येथील ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यात  पर्यटकांसाठी सोयी सुविधा उपलब्ध करून द्यावे, किल्ला संगोपनासाठी घेतलेल्या युनिटी संस्थेस शासनाने त्वरित याबाबत आदेश देण्याची आग्रही मागणी पर्यटक व इतिहासप्रेमी नागरिकांतून केली जात आहे.   

युनिटीने केला विकास

नळदुर्ग किल्ला महाराष्ट्र वैभव राज्य संरक्षित स्मारक संगोपन योजने अंतर्गत  युनिटी मल्टिकॉन्स कंपनीस संगोपनार्थ शासनाने करारान्वये 26 ऑगस्ट 2014 रोजी दिले आहे. यापूर्वी पुरातत्व खात्याच्या दुर्लक्षामुळे हा किल्ला पडझड होऊन अखेरची घटका मोजत होता. मात्र  युनिटीने अल्पावधीतच किल्ल्यात बाग बगीच्या, जागोजागी प्रसाधनगृह, आसन व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची सोय, किल्ल्यातील परिसर स्वच्छ करण्यासाठी स्वच्छता कर्मचारी नियुुक्‍ती करून 25 हजारांपेक्षा अधिक शोभेची झाडे, फुल झाडे लावल्यामुळे हे पर्यावरणाच्या दृष्टीने चांगले काम केले आहे. महत्त्वाच्या ठिकाणी सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसविण्यात आले असून ठिकठिकाणी कचराकुंडी उपलब्ध केल्याने किल्ल्याचे झपाट्याने रूपडे बदलले आहे. तसेच दहावीच्या नवीन अभ्यासक्रमात भूगोलमध्ये किल्ल्याचा समावेश करण्यात आला आहे.
किल्ल्यात करारानुसार 
काम करणे गरजेचे  
नळदुर्ग भुईकोट किल्ल्यास राज्यभरातून शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी, देश-विदेशातील इतिहासप्रेमी नागरिकांसह पर्यटक भेट देत आहेत. मात्र येथे  पर्यटकांसाठी अपुर्‍या सोयी सुविधा असल्याने पर्यटकांची गैरसोय होत आहे. अल्पोपहाराची सोय, वेगवेगळ्या प्रकारची कारंजे, म्युझियम हे सर्व कामे करण्याचे शासनासोबत केलेल्या करारामध्ये समावेश आहे. याबाबत युनिटी कंपनीशी संपर्क केला असता पुरातत्व खात्याने कोणतेही विकासात्मक कामे करू नये, असे आदेश असल्याचे म्हटले.

पायाभूत सुविधांची गरज

वास्तविक नळदुर्ग येथे पर्यटन व्यवसाय वाढीसाठी किल्ल्यामध्ये विविध प्रकारचे कारंजे, अल्पोपहार, लाईट अ‍ॅन्ड साऊंड शो, म्युझियम आदी काम करणे गरजेचे आहे. शासनाने किल्ला संगोपनार्थ घेतलेल्या संस्थेला वरील काम करण्याचे आदेश  देऊन किल्ल्यात राहणार्‍या बहुतांश कुटुंबाचे व शेतकर्‍यांचे किल्ल्याबाहेर पुनर्वसन करावे व ती जागा विकसीत करून पर्यटनास चालना द्यावी, अशी अपेक्षा नागरिकांतून व्युक्‍त होत आहे.