होमपेज › Solapur › शंभर वर्षांपासून पहिल्या नंदीध्वजास नागफणी परंपरा

शंभर वर्षांपासून पहिल्या नंदीध्वजास नागफणी परंपरा

Published On: Jan 10 2018 2:00AM | Last Updated: Jan 09 2018 10:17PM

बुकमार्क करा
सोलापूर : इरफान शेख

‘बोला...बोला... एकदा भक्तलिंग हर्र...हर्र...बोला’, ‘सिद्धेेश्‍वर महाराज की जय’ अशा जयघोषांनी सिद्धरामेश्‍वराची सोलापूरनगरी दुमदुमणार आहे. कन्नड भक्तीगीते, ढोल, ताशा, सनईच्या आवाज, सनई-चौघड्यांचा सुमधूर आवाज, हलग्यांचा कडकडाटात शिवयोगी श्री सिद्धेेश्‍वर महाराजांच्या यात्रेला 68 लिंगांना तैलाभिषेक करून प्रारंभ करण्यात येणार आहे. यामध्ये नंदीध्वजाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. शंभर वर्षांपासून पहिल्या नंदीध्वजास नागफणी बांधण्यात येतो.

सिद्धरामेश्‍वरांनी शहरात स्थापन केलेल्या 68 लिंगांना नंदीध्वज मिरवणुकीने तैलाभिषेक करण्यात येते. या मिरवणुकीत हजारो सिद्धेेश्‍वर भक्तांनी व मानकर्‍यांनी घातलेल्या पांढर्‍या शुभ्र रंगाच्या बाराबंदीने सर्वांचे लक्ष वेधून घेतात. 68 लिंगांना तैलाभिषेक विधीसाठी पहिल्या व दुसर्‍या, तिसर्‍या अशा सर्व नंदीध्वजांची पूजा करून मिरवणुकीने शहरात भक्तीमय वातावरण निर्माण होते.  श्री शिवयोगी सिद्धेेश्‍वर महाराज यांच्या प्रतिमेस पाहिले असता सात फण्यांचे नाग त्यांच्या मागे आहे, अशी प्रतिमा अनेक ठिकाणा पाहिली आहे.प्रथम नंदीध्वज हा श्री शिवयोगी सिद्धेश्‍वर महाराज यांचा आहे म्हणून प्रथम नंदीध्वजास नागफणी बांधण्यात येते. बाळी वेस येथील श्री मल्लिकार्जुन  मंदिरात प्रथम नंदीध्वजाचे नागफणी व  इतर नंदीध्वजांना वरील भागात बांधण्यासाठी खेळणी तयार केली जातात. सिद्धेेश्‍वर महायात्रेच्या काळात हिरेहब्बू यांच्या वाड्यात नंदीध्वजांच्या पूजेचा विधी पूर्ण झाल्यानंतर मिरवणुकीस सुरूवात करण्यात होते. मिरवणुकीत सर्वात पुढे पंचाचार्याचा भगवा ध्वज असतो. पाच पाच पिठांचा हा ध्वज प्रतीक मानण्यात येतो. त्यानंतर सनई-चौघडा, हलग्या, बग्गी, सिद्धरामेश्‍वरांची पालखी, त्यानंतर सिद्धरामेश्‍वरांचे सात नंदीध्वज असतात. ही मिरवणूक बाळी वेस येथील हिरेहब्बू वाड्यापासून सुरू करून मसरे गल्ली, दाते गणपती, दत्त चौक, सोन्या मारती, माणिक चौक, विजापूर वेस, जिल्हाधिकारी गेट, सिद्धेेश्‍वर मंदिर येथील अमृतलिंगास तैलाभिषेक करून त्यानंतर सर्व नंदीध्वज 68 लिंगांना तैलाभिषेक करण्यासाठी मार्गस्थ होतात. नागफणी बांधण्याच्या कार्यात गणेचारी परिवाराची महत्त्वाची भूमिका आहे. यामध्ये गेल्या 40 वर्षांपासून नि:स्वार्थ सेवा देत कार्य करणारी महत्त्वाची व्यक्ती म्हणजे इमाम चंडरकी होय. एक मुस्लिम व्यक्ती  प्रथम नंदीध्वजाचा नागफणी तयार करते, यावरुनच असा संदेश जातो की, सोन्नलगी (सोलापूर) शहरात सिद्धेश्‍वर महायात्रा काळात जातीय सलोखा टिकवण्याचे प्रयत्न केले जातात.  

पारंपरिक वस्तू
प्रथम नंदीध्वजामध्ये पारंपरिक वस्तूंचा उपयोग केला जातो. बांबू, वेत, सुपारी, दोरा, खळ, रंगीत कागद अशा वस्तू उपयोगात आणल्या जात असल्याची माहिती सचिन गणेचारी यांनी दिली.