Sun, Mar 24, 2019 04:13होमपेज › Solapur › आषाढीसाठी नगरपालिका आरोग्य विभाग सज्ज

आषाढीसाठी नगरपालिका आरोग्य विभाग सज्ज

Published On: Jul 09 2018 11:07PM | Last Updated: Jul 09 2018 10:33PMपंढरपूर : प्रतिनिधी

आषाढी यात्रेचा एकादशीचा मुख्य सोहळा दि. 23 रोजी साजरा होत असल्याने प्रशासनाच्यावतीने आषाढी यात्रेची जय्यत तयारी करण्यात येत आहे. आषाढी यात्रेत नगरपालिकेकडील कायमचे, हंगामी व बाहेरचे असे मिळून 2100 कर्मचारी नेमण्यात आले आहेत. तर कचरा उचलण्यासाठी 55 घंटागाड्या व कायमस्वरुपी 2475 शौचालयांची व्यवस्था करण्यात आली आहे. दि. 17 ते 29 जुलै दरम्यान स्वच्छता करण्यासाठी आरोग्य विभाग सज्ज राहणार आहे.
दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या पंढरीत श्री विठ्ठल रुक्मिणीच्या आषाढी यात्रा एकादशीला राज्याच्या कानाकोपर्‍यातून व देशभरातून सुमारे 12 ते 14 लाख भाविक दाखल होत असल्याने प्रशासनाच्यावतीने त्याची तयारी करण्यात येत आहे. नगराध्यक्षा साधनाताई भोसले, मुख्याधिकारी अभिजित बापट, सुनील वाळूजकर यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी भाविकांना अधिकाधिक सेवा देण्याचा प्रयत्न करत आहेत. येणार्‍या भाविकांचा विचार करून यात्रेत कचरा साचून दुर्गंधी व घाण होणार नाही. साथीचे रोग पसरणार नाहीत याची दक्षता आरोग्य विभाग घेणार आहे. याकरिता नगरपालिकेचे कायमचे 353 कर्मचारी, हंगामी 658 कर्मचारी राबणार आहेत. तसेच जिल्हा प्रशासनाकडून इरत जिल्ह्यातील कराड, कोल्हापूर, पुणे महानगरपालिका व नगरपालिकेतील सुमारे 1100 कर्मचारी बोलावण्यात आले आहेत.

यात्रा काळात दररोज 120 टन कचरा उचलण्यात येणार आहे. त्या पध्दतीने नियोजन करण्यात आले असून 55 घंटागाड्याव्दारे कचरा उचलण्यात येणार आहे. आवश्यक त्या ठिकाणी कचराकुंड्या ठेवण्यात आलेल्या आहेत. चंद्रभागा वाळवंट, 65 एकर, वाखरी पालखीतळ येथे कचरा कुजवण्यासाठी  ब्लोअर मशिनचा वापर करण्यात येणार आहे. डंपिंग ट्रॉली, टिपरच्या सहाय्याने कचरा उचलून नेण्यात येणार आहे.  

स्वच्छतेबाबत भाविकांना व मठाधिपतींना आवाहन करण्यात येत आहे. यात्रा कालावधीत दोन शिफ्टमध्ये कामगार काम पाहणार आहेत. नगरपालिकेमार्फत शहर व परिसर, 65 एकर, वाखरी पालखी तळ आदी 70 ठिकाणी कायमस्वरुपी 2475 शौचालये उभारण्यात आली आहेत. याचा वापर भाविकांना करता येणार आहे तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने बांधण्यात आलेली 1864 शौचालये  वापरासाठी खुली करण्यात आली आहेत. 
तसेच नगरपालिकेच्यावतीने आवश्यक त्या ठिकाणी 1200 तात्पुरती शौचालये उभारण्यात येत आहे. 10 ठिकाणी 100 फिरती शौचालयांची व्यवस्था करण्यात येत आहे. 

पावसाळ्याचे दिवस लक्षात घेऊन भाविकांना संसर्गजन्य आजार उद्भवू नयेत म्हणून संसर्गजन्य रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालय यांच्यावतीने भाविकांना आरोग्य सेवा पुरविण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या सूत्रांकडून देण्यात आली.