Thu, Jun 27, 2019 16:04होमपेज › Solapur › नाम फाऊंडेशनच्या कामाचे सुखद चित्र दिसेल : अनासपुरे

नाम फाऊंडेशनच्या कामाचे सुखद चित्र दिसेल : अनासपुरे

Published On: Apr 24 2018 11:26PM | Last Updated: Apr 24 2018 11:18PMबार्शी :  तालुका प्रतिनिधी  

दोन वर्षांत वेगवेगळ्या 175 ठिकाणी नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून आत्महत्याग्रस्त कुटुंबे, शहीद जवानांच्या कुटुंबातील सदस्यांना आर्थिक मदत, सामुदायिक विवाह सोहळे, वृक्षारोपण, नदी, ओढे खोलीकरण, जलयुक्त आदी विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले असून आगामी काळात त्याचे सुखद चित्र समाजात दिसून येईल, असे प्रतिपादन नाट्य व चित्रपट अभिनेते व नाम फाऊंडेशनचे मकरंद अनासपुरे यांनी केले. 

भगवंत महोत्सवाच्या निमित्ताने ते बार्शी येथील भगवंत मैदानावर आल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. समाजातील समस्या कमी करून लोकांना बळ देण्यासाठी ज्येष्ठ सिने अभिनेते नाना पाटेकर यांच्यासोबत नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून चांगले काम सुरू आहे. नाम फाऊंडेशन ही प्राधान्याने ग्रामीण भागातील जनतेच्या समस्यांवर लक्ष केंद्रीत करून ती सोडवण्याचा प्रयत्न करत आहे. ग्रामीण भाग हाच केंद्रबिंदू ठेऊन शेतकरी आत्महत्या, शेतीसाठी पाणी आदींवर ‘नाम फाऊंडेशन’चे काम सुरू आहे. यावेळी माजी आ. राजेंद्र राऊत, नगराध्यक्ष असिफ तांबोळी, उपनगराध्यक्ष कृष्णराज बारबोले, अरूण बारबोले, रावसाहेब मनगिरे, दीपक राऊत, शरद फुरडे, संतोष बारंगुळे, अजित कुंकूलोळ, संतोष सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

अनासपुरे पुढे म्हणाले की, कर्जबाजारी शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी चित्रपट अभिनेते नाना पाटेकर यांच्यासोबत नाम फाऊंडेशनच्यावतीने मन परिवर्तनाबरोबरच गरजवंताला 15 हजार रूपयांची आर्थिक मदत देऊन त्यांचे संसार उभे करण्याचे काम केले आहे. तसेच 1400 शिलाई मशिन, शेळीपालन या माध्यमातून महिलांना स्वत:च्या पायावर उभे करण्याचा प्रयत्न केला. 
 
ग्लोबल वॉर्मिंगच्या समस्या कमी करण्यासाठी फाऊंडेशन व इतर सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने जवळपास 1 लाख 75 हजार झाडांची लागवड करूण ति जगवण्यासाठी काम सुरू आहे.सामुदायिक विवाह सोहळ्यांची गरज ओळखून झालेल्या 4 विवाह सोहळ्यात 82 गरजू जोडप्यांचा विवाह करून दिला. आम्ही राजकारणापासून अलिप्त असून नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून जर कोण्या राजकारण्यास काम करावयाचे झाल्यास राजकारणाचे जोडे बाहेर काढून यावे लागेल, असेही अनासपुरे म्हणाले. समाजकारण व राजकारण वेगवेगळे असून राजकारण हा आमचा प्रांत नसल्याचेही त्यांनी सांगितले.  

नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून नदी खोलीकरण, रुंदीकरण आदी कामे माढा, विदर्भ, मराठवाडा, कोकण, पश्‍चिम महाराष्ट्रात ‘नाम फाऊंडेशन’च्या माध्यमातून केली आहेत. 
माण येथील माणगंगा नदी जिवंत करण्यात आली असून सध्या ही नदी पाण्याने भरून वाहत असल्यामुळे या नदी पात्रात बोटींग सुरू झाली आहे. पत्रकारांचेही यात मोठे योगदान आहे, असेही अनासपुरे म्हणाले.

Tags : NAM Foundation, Water Cup, Makarand Anaspure