Mon, Mar 25, 2019 05:05
    ब्रेकिंग    होमपेज › Solapur › एनएमके 1 (गोल्डन) सीताफळ वाण ठरतोय आकर्षणाचा केंद्रबिंदू

एनएमके 1 (गोल्डन) सीताफळ वाण ठरतोय आकर्षणाचा केंद्रबिंदू

Published On: Jan 02 2018 1:17AM | Last Updated: Jan 02 2018 1:17AM

बुकमार्क करा
बार्शी : गणेश गोडसे

बांधावरील पिकांवर संशोधन करून त्या पिकाला सन्मानाने बांधावरून बांधाच्या आतमध्ये आणण्याचे काम करणार्‍या गोरमाळे, ता. बार्शी येथील नवनाथ कसपटे यांना सीताफळाचा जादुगार म्हणून नवीन ओळख देशभरात निर्माण झाली आहे. 

शेती म्हणजे तोट्याचा, कमीपणाचा व्यवसाय अशी धारणा झालेल्या समाजातील अनेकांना विचार करण्यास भाग पाडणारा व थक्‍क करण्यास लावणारा असा कसपटे यांचा शेती प्रगतीचा प्रवास आहे. गोरमाळेसारख्या छोट्याशा खेडेगावात जन्माला येऊन संपूर्ण देशाबरोबरच परदेशातही आपल्या कार्याची ओळख निर्माण करून आपल्या बौद्धिक प्रगतीचा ठसा उमटवण्याचे काम नवनाथ कसपटे यांनी सीताफळ संशोधनाच्या माध्यमातून करून दाखवला आहे. आधी केले मग सांगितले, या उक्तीप्रमाणे कसपटे यांनी अगोदर आपल्या शेतात सलग दहा वर्ष, वेगवेगळ्या सीताफळांच्या झाडावर अनेक विविध प्रयोग करून निरिक्षण करत नवनवीन तंत्रज्ञानाचा त्यावर वापर करून संशोधन केले.संशोधन करून त्यांनी माळरानावर चक्क नंदनवन फुलवले आहे. रविंद्र व प्रवीण या बंधूंची नवनाथ कसपटे यांना त्यांच्या संशोधनाच्या कामात मोलाची साथ लाभली आहे. रविंद्र कसपटे हे शेतीस पूर्णवेळ देत आहेत, तर प्रवीण कसपटे हे शेतीबरोबरच ट्रॅक्टर विक्री फर्मच्या माध्यमातून उद्योग व्यवसायातही अग्रेसर आहेत. 
अखिल भारतीय सीताफळ  उत्पादक संघाचे अध्यक्ष असलेल्या कसपटे यांनी आपल्याबरोबरच देशभरात सीताफळाचे मळे फुलवले आहेत. त्यांनी संशोधित व उत्पादित केलेल्या सीताफळाच्या रोपावर देशभरात वेगवेगळ्या भागात, प्रांतामध्ये व राज्यात मोठ्या प्रमाणात सीताफळाची लागवड झाल्यामुळे सीताफळाच्या  उत्पादनामधून लाखो लोकांचे संसार फुलले आहेत. शास्त्रज्ञालाही लाजवेल  असेच संशोधनाचे महान काम कसपटे यांनी आपल्या कर्तृत्वाने करून दाखवले आहे. त्यांना समाजात मानाचे स्थान निर्माण करून देण्याचे काम कसपटे यांनी केलेले आहे. 
पूर्वीपासूनच शेती व्यवसाय, निरिक्षण, संशोधन करण्याची वृत्ती असलेले नवनाथ कसपटे हे सतत नवनवीन प्रयोग करत आहेत. जे काम हातात घ्यायचे ते प्रामाणिकपणे करायचे हे धोरण कायम कसपटे ठेवत आहेत. द्राक्ष उत्पादक असताना व संचालक म्हणून कार्यरत असताना सोलापूर जिल्ह्यामधून सर्वाधिक द्राक्षे परदेशात निर्यात करण्याचा व उत्पादन घेण्याचा बहुमान कसपटे यांनी यापूर्वी मिळवला आहे. काळानुसार आपल्या शेती उत्पादनामध्ये बदल करून बांधावरील व शेतकर्‍यांकडून दुर्लक्षित राहिलेल्या सीताफळाच्या उत्पादनास जागतिक बाजारपेठेत मानाचे स्थान मिळवून देण्याचे काम कसपटे पिता- पुत्रांनी करून दिले आहे. शेतीसंदर्भात समाजात व शेतकरी बांधवांमध्ये निर्माण होत असलेली नकारात्मक विचारसरणी पुसून काढण्याचे व शेतकर्‍यांना सर्व बाजूंनी बळ निर्माण करण्याचे कामही कसपटे यांनी चांगल्या पद्धतीने केले आहे. तसेच शेतीपूरक व्यवसायामधून  आर्थिक स्थैर्य मिळू शकते, हे दाखवून दिले आहे. सीताफळाच्या वेगवेगळ्या वाणांची गोरमाळे, ता. बार्शी येथे नवनाथ कसपटे यांनी निर्माण केलेली नर्सरी सध्या देशाचे आकर्षण ठरत आहे. दैनंदिन देशभरातील नवीन शेतकरी भेटी देऊन पाहाणी करून  रोपांची मागणी नोंदवताना दिसत आहेत. 

 25 एकरावर सीताफळाच्या शेतीची उभारणी करून वर्षाकाठी कोट्यवधी रुपयांची उलाढाल ते स्वउत्पादित सीताफळाच्या शेतीमधून करत आहेत. पुणे, मुंबई, दिल्लीबरोबरच ओमन देशातील कुवेतसह इतर देशातही त्यांनी उत्पादित केलेल्या सीताफळाच्या जातीस विक्रमी मागणी आहे. त्यांनी उत्पादित केलेल्या एनएमके जातीच्या वानावर पंजाब विद्यापीठामधील विद्यार्थ्यांने पीएचडी केली आहे. पाच सीताफळाच्या जातीचे त्यांनी संशोधन केले असून संशोनाबद्दल कृषीमंत्री राधामोहन सिंह यांनी त्यांना सन्मानित केले आहे. राज्याचे जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी नुकतीच मनुबन नर्सरीला भेट देऊन समाधान व्यक्त केले होते. 

मान्यवरांकडून कौतुकाची थाप :- माजी केंद्रिय कृषी मंत्री शरद पवार,  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मंत्री विनय कोरे आदींनी कसपटे यांच्या कार्याची दखल घेऊन कौतुकाची थाप दिली आहे.