Mon, Sep 23, 2019 00:27होमपेज › Solapur › राष्ट्रवादीचे दीपक साळुंखेंचा जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा

राष्ट्रवादीचे दीपक साळुंखेंचा जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा

Published On: Sep 11 2019 2:31AM | Last Updated: Sep 10 2019 10:36PM
सोलापूर : प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार दीपकआबा साळुंखे यांनी मंगळवारी (दि. 10) जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जिल्हाध्यक्षांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे राष्ट्रवादीला मोठा धक्‍का बसला आहे.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना पाठविलेल्या राजीनामा पत्रात जिल्हाध्यक्ष साळुंखे यांनी म्हटले आहे की, पक्षाने जिल्हाध्यक्षपदाची दिलेली जबाबदारी आपण  विश्‍वासाने व प्रामाणिकपणे पार पाडली आहे. सांगोला तालुक्यातील कार्यकर्त्यांनी आग्रही मागणी केली की, आपण यावेळी सांगोला विधानसभेची निवडणूक लढवावी. मी पक्षाकडे सांगोला विधानसभेसाठी उमेदवारीची  मागणी केलेली असून पक्षाकडून मला न्याय मिळेल, अशी अपेक्षा आहे. सांगोला विधानसभा निवडणूक तयारीच्या कामामुळे मला सांगोला तालुक्यामध्ये भरपूर वेळ द्यावा लागणार असल्याने पक्षाच्या कामाला वेळ देणे मला अशक्यप्राय आहे. त्यामुळे मी राष्ट्रवादी सोलापूर जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देत असून त्याचा स्वीकार करावा.

जिल्ह्यातील अनेक नेतेमंडळी, आजी-माजी आमदारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडण्याचा निरंतर कार्यक्रम सुरू केला आहे. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडे सक्षम उमेदवारांची वानवा असण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीची सुरू असलेली पडझड पाहता जिल्हाध्यक्ष साळुंखे यांच्या राजीनाम्याला महत्त्व प्राप्‍त झाले आहे.

दीपकआबा साळुंखे यांनी सांगोला विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीकडे उमेदवारीची मागणी केली असली तरी अद्याप पक्षाकडून सांगोल्यातून त्यांच्या उमेदवारीबाबत कोणतेही संकेत दिलेले नाहीत. साळुंखे राष्ट्रवादी सोडणार, अशी चर्चा सध्या सुरू आहे. राष्ट्रवादीने त्यांची  उमेदवारी सांगोल्यातून जाहीर केल्यास ते पक्ष सोडणार नाही, असे त्यांचे कार्यकर्ते सांगत आहेत. त्यांनी पक्ष सोडल्यास राष्ट्रवादीला गळतीचा आणखी एक धक्‍का सहन करावा लागणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.