होमपेज › Solapur › मुख्यमंत्र्यांच्या भाषणात जनावरं; दिल्‍लीवरून आला रिंगमास्‍टर : मुंडे

दिल्‍लीवरून आला रिंगमास्‍टर.. : मुंडे

Published On: Apr 07 2018 10:54AM | Last Updated: Apr 07 2018 10:54AMसोलापूर : पुढारी ऑनलाईन

मुंबईत झालेल्या भाजपच्या महामेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्‍ट्रवादी काँग्रेसवर हल्‍लाबोल केला. त्यानंतर सोलापुरातील हल्‍लाबोल आंदोलनात बोलताना विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री आणि भाजपवर तोंडसुख घेतले. "आज मुख्यमंत्र्यांच्या भाषणात फक्त जनावरच दिसली. कारण दिल्लीवरून रिंगमास्टर आला होता. त्याला खूश करण्यासाठी हे सुरु होतं," असे टीकास्‍त्र मुंडेंनी सोडले. 

राष्‍ट्रवादी काँग्रेसच्या हल्‍लाबोल आंदोलनाचा चौथा व अंतिम टप्‍पा पश्चिम महाराष्‍ट्रात सुरू आहे. शुक्रवारी रात्री सोलापुरात राष्‍ट्रवादी नेत्यांच्या उपस्‍थित सभा झाली. यावेळी बोलताना मुंबईतील भाजप नेत्यांच्या राष्‍ट्रवादीवरील टीकेला धनंजय मुंडेंनी जोरदार प्रत्युत्तर दिले. "हे विरोधी पक्षाला लांडगे म्हणतात. २०१४ च्या वेळी तुम्ही एकत्र आला होता, त्याला कशाचा कळप म्हणायचा काय? असा सवाल मुंडेंनी केला.

तुमचे वय काय? बोलताय काय? : मुंडे

मुख्यमंत्री महोदय जनाची नाही तर मनाची लाज बाळगा. तुमचे गुरू आमच्या गुरूचे बोट पकडून राजकारणात आले आहेत, हे बहुदा तुम्ही विसरलात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुमचे वय काय? कर्तृत्व काय? पवार साहेबांविषयी बोलण्याची तुमची लायकी नाही, अशा शब्‍दांत मुंडेंनी मुख्यमंत्र्यांवर तोफ डागली. 

भाजपच्या १६ मंत्र्यांचे भ्रष्‍टाचार बाहेर काढले : मुंडे

मुंबईतील महामेळाव्यात मंत्री चंद्रकांत पाटील यांनी छगन भुजबळ यांच्या शेजारी राष्‍ट्रवादीच्या नेत्यांसाठी कोठड्या रिकाम्या आहेत, अशा शब्‍दांत चुचकारले होते. त्याला प्रत्युत्तर देताना मुंडे म्‍हणाले, तुमच्या १६ मंत्र्यांचे भ्रष्टाचार आम्ही बाहेर काढले. त्यांची साधी चौकशी तुम्हाला करता येत नाही. मी मुख्यमंत्र्यांना आव्हान करतो की मुख्यमंत्र्यांनी या मंत्र्यांची चौकशी करावी. तरच म्हणता येईल की तुमचे सरकार पारदर्शक आहे, असे आव्‍हान मुंडेंनी मुख्यमंत्र्यांना दिले.