Fri, Apr 26, 2019 19:48होमपेज › Solapur › राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांची रविवारी निवड

राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांची रविवारी निवड

Published On: Mar 02 2018 12:49AM | Last Updated: Mar 01 2018 11:01PMपंढरपूर : प्रतिनिधी

आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्ष संघटना अधिक बळकट करण्याकरिता राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकार्‍यांच्या बदल्या आणि नवनियुक्त्या करण्याचे धोरण अवलंबले आहे. त्यानुसार रविवार दि. 4 रोजी सोलापूर जिल्हा राष्ट्रवादीच्या अध्यक्षांची निवड केली जाणार असल्याचे पक्षीय सूत्रांकडून समजते. दरम्यान, गेल्या वर्षभरात अतिशय चांगले काम केलेल्या विद्यमान जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे यांनाच पुन्हा एकदा मुदतवाढ दिली जाईल, असे बोलले जात आहे. त्याचबरोबर धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या रूपात नवीन आणि तरुण चेहरा दिला जाईल, अशीही चर्चा सुरू आहे. 

लोकसभा निवडणुका जेमतेम एक वर्षावर येऊन ठेपल्या आहेत, तर विधानसभा  निवडणुका आता पावणे दोन वर्षांत होण्याची शक्यता आहेत. केंद्र सरकारच्या मनात आल्यास लोकसभेसोबतच विधानसभा निवडणुकाही घेतल्या जातील, अशी शक्यता गृहीत धरून राजकीय पक्ष कामास लागले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने या अनुषंगानेच पक्षीय पातळीवर पदाधिकार्‍यांच्या बदल्या आणि नवनियुक्त्यांचे धोरण अवलंबले आहे. येत्या एप्रिल महिन्यात सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे हल्लाबोल आंदोलन येणार आहे. प. महाराष्ट्रातील या आंदोलनाचा समारोपही सोलापूरला केला जाण्याची शक्यता गृहीत धरून पक्ष, संघटना कार्यक्षम व गतिमान करण्यासाठी तालुका तसेच सोलापूर शहर पदाधिकार्‍यांच्या नियुक्त्या करण्यात येत आहेत. त्याचबरोबर जिल्हाध्यक्षांच्या कार्याचाही आढावा घेतला जात असून स्थानिक  कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. 

विद्यमान जिल्हाध्यक्ष माजी आमदार दीपक साळुंखे यांनी गेल्या वर्षभरात अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलेले आहे. जिल्ह्यातील सर्वच तालुका कार्यकारिणीच्या निवडी करून विविध तालुकास्तरीय आंदोलने केलेली आहेत. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात राष्ट्रवादीत असलेली मरगळ गेल्या आठ-दहा महिन्यांपासून दूर झाली आहे. कामाची हीच गती पुढे चालू ठेवण्याकरिता त्यांना आगामी विधानसभा निवडणुका होईपर्यंत मुदतवाढ दिली जाईल, असे बोलले जात आहे. दरम्यान, माळशिरस तालुक्यातील राष्ट्रवादीचे नेते आणि जि.प.चे माजी पक्षनेते धैर्यशील मोहिते-पाटील यांनाही संधी देऊन नव्या दमाच्या नेतृत्वाला जिल्ह्यात संघटना अधिक आक्रमक करण्यासाठी पुढे आणले जाईल, असेही पक्षीय वर्तुळात बोलले जात आहे. साळुंखे-पाटील आणि धैर्यशील मोहिते-पाटील यांच्याव्यतिरिक्‍त दुसरे नाव अजूनही पुढे आलेले नाही, त्यामुळे या दोघांपैकीच एक जिल्हाध्यक्ष असणार आहे, असे बोलले जात आहे. कार्यकर्त्यांचे या निवडीकडे लक्ष लागले आहे.

पंढरपूर विभागात राष्ट्रवादीत उत्साहाचे वातावरण

पंढरपूर विभाग हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता. गेल्या विधानसभेच्या तोंडावर या विभागात पक्षाला मोठे भगदाड पडल्यामुळे पक्ष अडचणीत आला होता. मात्र, गेल्या वर्षभरात पंढरपूर विभागात राष्ट्रवादीने आपले अस्तित्व पुन्हा दाखवण्यास सुरुवात केली आहे. मंगळवेढा नगरपालिका ताब्यात राखली आहे. तसेच जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत माळशिरस, माढा तालुक्यात लक्षणीय यश मिळवले आहे. पंढरपूर शहर आणि तालुक्यात एकही प्रमुख नेता सोबत नसताना राष्ट्रवादीने नगरपालिका निवडणुकीत निर्णायक मते मिळवली, तर जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत तालुक्यात खाते उघडून आपले अस्तित्व प्रस्थापित नेत्यांना दाखवून दिले आहे. प्रांतिक सदस्य राजूबापू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकाध्यक्ष अ‍ॅड. दीपक पवार, शहराध्यक्ष सुधीर भोसले यांनी पक्ष, संघटना मजबूत करण्याचा चांगला प्रयत्न केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीकडे येणार्‍या कार्यकर्त्यांची संख्या वाढली आहे.