Mon, Jul 22, 2019 13:34होमपेज › Solapur › विजयदादा सक्रिय झाल्याने राष्ट्रवादीला अच्छे दिन!

विजयदादा सक्रिय झाल्याने राष्ट्रवादीला अच्छे दिन!

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पंढरपूर : प्रतिनिधी

गेल्या काही वर्षांपासून पक्ष नेतृत्वावर नाराज असूनही पक्षावर निष्ठा ठेऊन असलेले खासदार विजयसिंह मोहिते-पाटील पक्षात पुन्हा सक्रिय झाल्यामुळे सोलापूर जिल्हा राष्ट्रवादीला अच्छे दिन येण्याची चिन्हे दिसत आहेत. पक्षातील सर्व पदाधिकारी, तालुका कार्यकारिणीच्या निवडी झाल्या असून त्यातही मोहिते-पाटील समर्थकांना झुकते माप मिळाल्यामुळे मोहिते पाटील समर्थक नव्या जोमाने कामास लागले आहेत असे दिसून येते. 

सोलापूर जिल्ह्यातील राजकारणात मागील आठ-दहा वर्षांपासून मोहिते पाटील यांना बाजूला करण्याचा प्रयत्न सुरू होता. राष्ट्रवादीतील वरिष्ठ नेत्यांनीही या कारस्थानात महत्वाची भूमिका बजावली होती. परंतु, यामुळे राष्ट्रवादीचेच अधिक नुकसान झाल्याचे दिसून आले. पक्षाचा बालेकिल्ला जिल्हा परिषद यामुळेच गमवावी लागली. या पार्श्वभूमीवर आता पक्ष पातळीवर मोहिते-पाटील यांच्या कलाने चालण्याची भूमिका घेतल्याचे दिसते. पक्षाचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे, कार्याध्यक्ष बळीराम साठे, आणि सर्व कार्यकारिणी विजय दादांना विश्वासात घेऊन काम करीत असल्याचे दिसते. परिणामी विजयदादा पक्षात पुन्हा सक्रिय झाले आहेत. 

पक्षाचे वरिष्ठ नेते आले तरी दांडी मारणारे विजय दादा आता जिल्हा बैठकांना हजर राहू लागले आहेत. त्यामुळे सामान्य कार्यकर्त्यांतही उत्साह संचारला आहे. शिवसेना, भाजप, कांग्रेस या पक्षामध्ये अजून कसलाच ताळमेळ नाही. तोवर राष्ट्रवादीने लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली आहे.आणि महत्वाचे म्हणजे विजयदादा सक्रिय झाल्यामुळे आगामी निवडणुकीत जिल्ह्यात राष्ट्रवादीला अच्छे दिन येतील असे दिसू लागले आहे.