Sun, Jul 21, 2019 02:21होमपेज › Solapur › नगराध्यक्षांच्या टिकेतून अनेकांना ‘सूचक मेसेज!’

नगराध्यक्षांच्या टिकेतून अनेकांना ‘सूचक मेसेज!’

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

उस्मानाबाद : भीमाशंकर वाघमारे

नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकरांच्या पत्रकार परिषदेनंतर राजकीय वर्तुळाला नवीन चर्चेचा विषय मिळाला आहे. माझ्या संभाव्य उमेदवारीची राष्ट्रवादीला भीती वाटत आहे, असे सांगून त्यांनी ‘अनेकांना’ सूचक ‘मेसेज’ दिल्याची चर्चा सुरु झाली आहे. याशिवाय नगराध्यक्षांची नजर आता विधानसभेकडे लागली असल्याचे संकेतही त्यांनी दिले आहेत. 

विधानसभा निवडणुकीला अजून दीड वर्षांचा कालावधी आहे. तोपर्यंत पुलाखालून बरेच पाणी वाहून जाणार आहे. ऐनवेळी पक्ष कोणता हे उमेदवारांनीही अजून निश्‍चित केलेले नाही. त्यातच शिवसेनेचे नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी माझ्या उमेदवारीची राष्ट्रवादीला भीती वाटत असल्यानेच ते माझी बदनामी करत आहेत, असा आरोप केला आहे. राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी सुरु केलेल्या आंदोलनावर उत्तर देण्यासाठी हे विधान केले होेते. वास्तविक राष्ट्रवादीचे आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी गेल्यावेळी ओमप्रकाश राजेनिंबाळकरांचा पराभव केला आहे. आगामी निवडणुकीत शिवसेनेचा उमेदवार कोण असणार की बाहेरचा उमेदवार आयात करुन पक्ष त्याच्या गळ्यात उमेदवारीची माळ घालणार, ही चर्चा सुरु असतानाच नगराध्यक्षांनी हे विधान करुन आपल्या नावाचाही विचार व्हावा, असा मेसेज दिल्याचे मानले जात आहे.

त्यातच माजी आ. ओमप्रकाश राजेनिंबाळकरांचेही  नाव  उमेदवारीसाठी अजून चर्चेत असताना नगराध्यक्षांनी आपले घोडे पुढे दामटल्याचे मेसेजही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सुरुवातीला काँग्रेसकडून नगरसेवक, पुढे राष्ट्रवादीकडून नगराध्यक्ष त्यानंतर आता शिवसेनेकडून जनतेतून नगराध्यक्ष असलेल्या राजेनिंबाळकरांनी अगदी आक्रमकपणे राष्ट्रवादी काँग्रेस तसेच नाव न घेता आ. पाटील यांच्यावर टीका केली आहे. त्यांच्या टिकेचा रोख व मुद्दे पाहता त्यांनी विधानसभेची तयारी सुरु केली असावी, असा अर्थ राजकीय जाणकार काढू लागले आहेत. विजयी कोण होणार याचे उत्तर मतदान यंत्रातून मिळणार असले तरी विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारीचे पडघम आत्तापासूनच वाजत असल्याचे चित्र दिसू लागले आहे. 

Tags : Solapur, Solapur News, potential, candidate, afraid, NCP


  •